नाशिक - आदिवासी विकास विभागाची बनावट वेबसाइट तयार करून बनावट नियुक्तिपत्र देत एकाकडून साडेदहा लाख रुपये घेण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काही लोकांनी आदिवासी विकास विभागाच्या लोगोचा वापर करत बनावट वेबसाइट सुरू केली. या माध्यमातून त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना शिक्षक व इतर नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवले. बनावट वेबसाइटच्या माध्यमातून त्यांनी संदीप कौतिक पाटील (रा. पिंपळवाड म्हाळसा, ता. चाळीसगाव) या युवकाला फसवले. शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी संदीपकडून १० लाख ५० हजार रुपये उकळले. संशयितांनी बनावट नियुक्तिपत्र तयार करून त्यावर अपर आयुक्तांची बनावट सही तसेच शिक्का मारून नियुक्तिपत्र तयार केले. हे पत्र दिल्यानंतर उर्वरित सहा लाख ५० हजार रुपये संदीप पाटील या लोकांना देणार होता. मात्र, हा प्रकार समोर आल्याने संदीप यांनी पाेलिसांत दाखल केली. पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा नाेंदवून उदयनाथ श्यामनारायण सिंग (रा.भाईंदर), हेमंत सिताराम पाटील (३१, देवपूर, धुळे) सुरेश गोकुळ पाटील (३४, देवपूर, धुळे) आणि तुकाराम रामसिंग पवार (५६, तामसवाडी, ता. पारोळा) यांना अटक केली अाहे.
घोटाळ्यांची मालिका
समाजकल्याण विभाग आणि आदिवासी विकास विभागात दररोज घोटाळे समोर येत आहेत. अगाेदर समाजकल्याणचा शिष्यवृत्ती घोटाळा, आदिवासी विकास विभागाचा टूडी अॅनिमेशन शिष्यवृत्ती घोटाळा, संत रोहिदास महामंडळात लाभार्थींना कर्जवाटप गोंधळ, तर बनावट जातवैधता प्रमाणपत्र अादी घाेटाळ्यांमुळे दोन्ही विभाग चर्चेचा विषय बनले.