नाशिकरोड- देवीचौकातील रेल्वेच्या पोस्ट कार्यालयातील एका पार्सलमधील आवाजाने मंगळवारी केंद्रीय दलासह बॉम्ब शोध नाशक पथकाचीही चांगलीच धावपळ उडाली. पार्सलमधील आवाज शेतीसंबंधित एका यंत्राचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपास यंत्रणांसह रेल्वे प्रवाशांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.
पंचवटीतून आलेल्या खाकी रंगाच्या पार्सलमधून कर्मचाऱ्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विचित्र आवाज ऐकला. पार्सलमधील हा आवाज संवेदनशील वाटल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांकरवी ही बाब लोहमार्ग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबल यांना कळविली. त्यानंतर लोहमार्ग पोलिस केंद्रीय सुरक्षा दलासह बॉम्बशोध नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयित पार्सल आठ वाजेच्या सुमारास देवी चौकात रस्त्यावर आणण्यात आले. तपासणीनंतर पिकावरील फवारणीसाठीचा स्वयंचलित पंपाचा आवाज येत असल्याचे निष्पन्न झाले. या तपासणीमुळे पाऊण तास देवी चौक परिसर वेठीस धरला गेला होता. याशिवाय दोन्ही गेट बंद असल्याने रेल्वे प्रवाशांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला.