आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांना कॅशलेस अनामत भरण्यासाठी यंत्रणाच नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रोख रकमेऐवजी कॅशलेस व्यवहारांसाठी थेट पंतप्रधानांकडूनच आग्रह धरला जात असताना शासनाच्याच धाेरणानुसार, निवडणूक उमेदवारांनी आपली अनामत रक्कम कॅशलेस पद्धतीने भरण्याची मागणी केली तर ती स्वीकारण्यासाठी सध्यातरी यंत्रणेकडे कुठलीच व्यवस्था नाही. त्यामुळेच उमेदवारांनी कॅशलेस डिपाॅझिट भरायचा आग्रह धरल्यास  करायचे काय? अशा पेचात पडलेल्या  महसूल यंत्रणेने थेट निवडणूक आयाेगाकडेच मार्गदर्शन मागविले आहे.

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना कॅशलेस स्वरूपात त्यांची अनामत रक्कम भरण्यासाठी यंत्रणेकडे  मात्र व्यवस्थाच नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही बाब पुढे आली. पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कॅशलेस स्वरूपात डिपाॅझिट भरण्याची इच्छा व्यक्त केली. पण  निवडणूक आयाेगाच्या नियमावलीत नियमच नसल्याने यंत्रणेची अडचण झाली.   निवडणुकासाठी असा कुठला नियम नाही. त्यामुळे कॅशलेस डिपाॅझिटबाबत काय करावे यासाठी विभागीय आयुक्तांनी अाता निवडणूक आयाेगाकडे मागर्दशर्न मागविले आहे.
 
मार्गदर्शनाकडे लक्ष
नाेटाबंदीनंतर शासनाकडून कॅशलेस व्यवहारासाठी आवाहन केले जात आहे. त्यामुळे बँकेतून, एटीएममधून नाेटा किती काढायच्या यावर निर्बंध आहेत. हे सगळे कॅशलेस कामकाज वाढविण्यासाठी घडत असताना लोकशाहीत अत्यंत महत्त्व असलेल्या  निवडणूक प्रक्रियेत मात्र कॅशलेस धाेरणाचा अमलच नसल्याने हा विषय येत्या काळात चर्चेचा विषय ठरणार आहे. त्यामुळे आयाेगाच्या मार्गदर्शनाकडे यंत्रणेचे लक्ष लागून आहे.

कायद्यात बदल हाच पर्याय
निवडणूक नियमावलीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राेख स्वरूपात अनामत रक्कम स्वीकारण्याच्या सूचना अायाेगाने दिलेल्या आहेत. धनादेश, ड्राफ्ट स्वरूपात अनामत स्वीकारली जाऊ नये. असे स्पष्ट सूचित केले आहे. त्यामुळे कॅशलेस अनामत रक्कम स्वीकारण्याची अडचण असून, त्यासाठी कायद्यात बदल  करावा लागणार असल्याचे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.