आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यावर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ शिवसैनिकांना माफी द्या, भुजबळांच्या साक्षीने गहिवरले शिवसैनिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझे पुन्हा मनोमिलन झाले होते. त्यामुळे माझ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात आता माझी कोणतीही तक्रार नसल्याची साक्ष राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी किल्ला कोर्टात शनिवारी दिली. राज्यात १९९७ मध्ये युती सरकार असताना विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे वीस वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकरण या साक्षीमुळे निकाली निघण्याची शक्यता आहे.
     
सध्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भुजबळ या साक्षीसाठी स्वत: न्यायालयात हजर झाले. साक्षीदरम्यान भुजबळ म्हणाले,  या खटल्याला आता २० वर्षांहून अधिक काळ लोटला असून दरम्यानच्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यातील दुरावाही मिटला. त्यामुळे माझी या शिवसैनिकांबाबत कुठलीही तक्रार नसून या आरोपींना माफी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयासमोर केली. भुजबळांच्या साक्षीमुळे न्यायालयात उपस्थित असलेले शिवसैनिक काही काळ भावुक झाले होते. दरम्यान, साक्ष आटोपून भुजबळ न्यायालयाबाहेर जात असताना आरोप असलेल्या ९ शिवसैनिकांनी भुजबळांचे आभार मानले. 
     
काय होते प्रकरण?   
१९९६-९७ दरम्यान शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना भुजबळ विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. या काळात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच चेंबूरच्या रमाबाई आंबेडकरनगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेची घटना घडली होती. त्यामुळे या घटनेच्या अनुषंगाने विधिमंडळात भुजबळ यांनी सरकारवर तुफानी हल्ला चढवला होता. हे सरकारच बळी पडलेल्यांचे खुनी असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. 

भुजबळांचे हल्ले परतवणे सरकारला अवघड जात असतानाच एका नागरिकाने पुतळ्याची विटंबना छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून केल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. त्या आधारे शिवसेनेच्या मुखपत्रात ‘हाच तो नराधम राक्षस, ज्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना घडवून आणली,’ अशा बातमी झळकली होती. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले होते. खोडसाळ बातमी छापल्याबद्दल संतप्त झालेल्या भुजबळांनी त्या वेळी ‘सामना’चे मुख्य संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर भुजबळांविरोधात शिवसैनिकांत चांगलाच रोष होता. त्यानंतर शिवसैनिकांच्या एका गटाने विरोधी पक्षनेत्यांच्या ए-१० बंगल्यावर चाल करत बंगल्याच्या सर्व बाजूंनी हल्ला केला होता. मात्र, भुजबळ बंगल्याच्या अगदी आतल्या भागात असल्याने ते या हल्ल्यातून बचावले होते.
बातम्या आणखी आहेत...