आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यानंतरही राज्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातिभेद, विषमता, रूढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षाही भाेगली. मात्र स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी तर स्वातंत्र्यानंतर वातानुकूलित संस्कृतीमध्ये वावरणाऱ्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर अन्याय केला’, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केला.  

सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर (जि. नाशिक) येथे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सावरकर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात अाला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘तात्याराव सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजातील विषमता दूर करण्यासाठी इंग्रजांचा अन्याय सहन केला. मात्र, इंग्रजांनी जनावरांनाही लाजवेल अशी काळ्या पाण्याची शिक्षा त्यांच्यावर लादली. मात्र या शिक्षेला न डगमगता सावरकरांनी आपल्या तेजस्वी आणि कवितांमधून आपले विचार समाजापर्यंत पोहाेचवले. स्वातंत्र्यानंतर अंदमान- निकोबार येथील तुरुंगात सावरकरांचे नाव असलेले फलक काढून तत्कालीन नालायक राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर अन्याय केला,’ असा अाराेपही फडणवीस यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील अाघाडी सरकारचे नाव न घेता केला.  
पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘सावरकरांनी त्याग, देशप्रेम आणि सहनशीलतेची शिकवण दिली. त्यांचा जीवनलेख सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.  सावरकरांच्या स्मारकाचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ६५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला अाहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.  
 
भगूरमध्ये संग्रहालयासाठी करणार मदत 
सावरकर यांचे जाज्वल्य विचार हे नव्या पिढीसमोर ऊर्जादायी प्रेरणा आहे. मात्र, दुर्दैवाने त्यांचे विचार, चरित्र हे समाजापर्यंत पोहोचलेच नाही. सावरकरांचे विचार खोलवर रुजविण्यासाठी भगूर येथे सावरकर आणि क्रांतिकारकांच्या एका भव्यदिव्य संग्रहालयाची उभारणी करावी, अशी मागणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी देत महाजन यांना हे काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या.
 
मंदिरापेक्षाही स्मारकात अधिक पवित्र भावना   
तेजस्विता, तपस्विता आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतिकारकांचे प्रेरणास्राेत होते. बारा वर्षांपेक्षा अधिक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे समाजसुधारक असलेल्या सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहे,  असा अभिप्राय मुख्यमंत्र्यांनी सावरकर स्मारकातील नाेंदवहीत लिहिला.  
 
शिवसेनेच्या अामदार- खासदारांना कार्यक्रमातून डावलले   
सावरकर यांची जन्मभूमी असलेले भगूर गाव हे नाशिक आणि देवळाली मतदारसंघात येते. मात्र, शिवसेनेचे स्थानिक खासदार हेमंत गोडसे आणि आमदार योगेश घोलप यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात अाले नव्हते. भगूरच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांना सुरुवातीला स्मारकामध्ये जाण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला होता. ‘यादीमध्ये तुमचे नाव नसल्याने तुम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत स्मारकामध्ये जाता येणार नाही’, असे पोलिसांनी त्यांना सांगितले. मात्र, पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर करंजकर व नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्मारकामध्ये जाण्यास परवानगी देण्यात अाली. 
तेजस्विता, तपस्विता आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतिकारकांचे प्रेरणास्राेत होते. बारा वर्षांपेक्षा अधिक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे समाजसुधारक असलेल्या सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहे,  असा अभिप्राय मुख्यमंत्र्यांनी सावरकर स्मारकातील नाेंदवहीत लिहिला.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...