आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये तब्बल महिनाभर फडकणार भारतीय तिरंगा, चित्रकार प्रफुल्ल सावंतांच्या कलेमुळे शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चित्रकार आणि त्याच्या कलेच्या सन्मान म्हणून विदेशात त्याच्या देशाचा ध्वज महिनाभर सन्मानार्थ फडकणे, यासारखा अनोखा जागतिक बहुमान प्राप्त होणे ही खरेतर दुर्मिळ घटना. मात्र, नाशिकचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी चीनमध्ये ही किमया घडवून दाखवली. 
 
चीनमधील शांघाय येथे एप्रिलला भारतीय ध्वजाला फडकण्याचा सन्मान लाभला. शांघायमधील झोजीजाव या वॉटर टाउन या जगप्रसिद्ध ठिकाणी शाॅनहुवा वर्ल्ड हेरीटेज आर्ट गॅलरीत चित्रकार सावंत यांच्या ४४ जलरंग माध्यमातील निसर्गचित्रांचे चित्रप्रदर्शन, सोलो शोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा नुकताच शुभारंभ झाला.
 
याप्रसंगी त्यांच्या चित्रकलेचा यथोचित सन्मान म्हणून भारतीय तिरंगा चित्रप्रदर्शनाच्या एक महिन्याच्या कालावधीत फडकविला जाणार आहे. असा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले भारतीय चित्रकार ठरले आहेत. 
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन चीनमधील सुप्रसिध्द ज्येष्ठ चित्रकार झीडान चेन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या जलरंगातील शक्तीस्थळे, शैली, नावीन्य, धाडस इत्यादी बाबींवर विचार मांडत गौरवोद्गार काढले. प्रमुख पाहुणे म्हणून ली. झीन. यिंग, सुप्रसिध्द चित्रकार गांग लीयान, चिन्तवच्या मीस लुई, तसेच सुप्रसिध्द चित्रकार लुयी यांनी उपस्थित होते. चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या प्रदर्शनातील सर्व ४४ चित्रांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. हे पुस्तक विविध देशात वितरित केले जाणार आहे. 
 
मनोगत व्यक्त करताना चित्रकार सावंत म्हणाले की, चीनला चित्रकलेतील जलरंग माध्यमाचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि अशा ठिकाणी अापल्याला कलेच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व करण्यात मिळावे, हे खूप मोठे भाग्य समजतो. या पूर्वीही सातवेळा चायनाच्या निमंत्रणावरून चायनात कला सादर करता आली. 
 
या चित्रप्रदर्शनात सावंत यांनी नाशिकची एेतिहासिक, अाध्यात्मिक वास्तू परंपरा, गोदावरी नदी, गोदाघाट, मंदिरे अशी वैभवशाली भारतीय संस्कृती सादर केली आहे. 
 
पाच दिवसीय वर्कशॉप 
या प्रदर्शनासोबत चित्रकार प्रफुल्ल सावंतांचे याच ठिकाणी दिवसीय इंटरनॅशल वाॅटर कलर पेंटीग वर्क शाॅपचेही खास नियोजन आयोजकांनी केले असून, त्यात चायनासह परदेशातील अनेक चित्रकार त्यांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहेत. १६ एप्रिल रोजी सावंत मायदेशी परतणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...