आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन नाशिक’ हवेतच, अशा होत्या घाेषणा, अशी आहे वस्तुस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मराठवाड्याला सोडलेले पाणी, अन्यायकारक टीडीआर धोरण, कपाट क्षेत्राचा भिजत पडलेला मुद्दा, एकलहरा प्रकल्पाचे संभाव्य स्थलांतरण, वाढती गुन्हेगारी अशा एक नाही असंख्य मुद्यांनी घेरलेल्या भारतीय जनता पक्षाची कोंडी फोडण्यासाठी एप्रिलमध्ये गोदातीरावर ‘मिशन नाशिकचा’ राग आळवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका, पोलिस खात्यामार्फत काही विशेष योजनांचे प्रस्ताव आले तर तातडीने मंजूर केले जातील, असे सांगत नाशिककरांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात दोन महिने उलटल्यानंतरही त्यावर कार्यवाही नसून, महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या दीक्षांत सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये येणारे फडणवीस आता त्याचा काही आढावा घेतात का, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, काही योजनांचे प्रस्ताव आधीच केंद्र राज्य शासनाकडे पडून असून, त्यावरच निर्णय होत नसल्यामुळे उर्वरितांचे काय करावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

भाजपचा फारसा प्रभाव नसताना केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्रिपदाचे तरुण तडफदार उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून नाशिककरांनी तिन्ही विधानसभा मतदारसंघांत कमळ फुलवले, मात्र सत्ता मिळाल्यानंतर भाजपकडून नाशिककरांची विकासकामेतर झालीच नाही, याउलट मूलभूत प्रश्नांवरून तोंडचे पाणी पळाले. यापूर्वी मनसेचे तीन अामदार असूनही काहीच काम झाल्यामुळे नाशिककरांनी धडा शिकवला हाेता. मात्र, त्यावेळी मनसेची राज्यात सत्ता नसल्याचे कारण देत विकासकामासाठी कमी पडल्याची सारवासारव आमदार करीत होते. राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे दुर्दैवाने अशी सबब भाजप आमदारांना मांडण्याचा पर्याय नाही. अशा परिस्थितीत सत्तेत असून, शिवसेनेने दहा विविध मुद्यांवर भाजपला घेरण्यासाठी विराट मेळावा भरवून नाशिककरांच्या भावनांना हात घातला. पक्षाविरोधातील वातावरण निवळण्यासाठी नाशिकमध्ये भाजपची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक एप्रिलच्या सुरुवातीला घेण्यात आली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी अापल्या खास शैलीत नाशिककरांसाठी पोतडीतून एकापाठाेपाठ एक घाेषणांचा पाऊस पाडला. गोदावरी किनारी झालेल्या सभेत खासकरून प्रदूषित गाेदामाईला स्वच्छ करण्याचा नारा देण्यात अाला. प्रत्यक्षात यातील एकाही आश्वासनाच्या पूर्तीच्या दिशेने प्रवास सुरू झालेला नाही. यातील अनेक अाश्वासने महापालिकेच्या जुन्याच प्रस्तावाशी संबंधित असून, सद्यस्थितीत असे प्रस्ताव केंद्र राज्य शासनाकडे पडून असून, काेणतीही कारवाई झालेली नाही.

नाशिकला लाल दिवा मिळणार का, मुख्यमंत्र्यांकडे लक्ष
राज्य मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून महसूलमंत्रिपदी एकनाथ खडसे जलसंपदामंत्री गिरीश महाजन या जळगाव जिल्ह्यातील दाेन मातब्बर नेत्यांचा समावेश असल्याने अन्य लाेकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर हाेता. त्यातच खडसेंच्या राजीनाम्याने महाजनांकडे जळगावचे पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता अाहे. त्यांच्या जागेवर नाशिकच्याच प्रथमच निवडून अालेल्या चारपैकी एका अामदाराची वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावली जात अाहे. त्यातच नाशिकमध्ये टीडीअार धाेरण, अाराेग्य विद्यापीठ विस्तार, मराठवाड्याला पाणी साेडल्याने निर्माण झालेला टंचाईचा प्रश्न अाणि कपाट क्षेत्र वादाने भाजप सरकारविराेधात संतापाची भावना अाहे. अागामी पालिका निवडणूक लक्षात घेता शहरवासीयांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून नाशिकला लाल दिवा मिळताे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.

लवकरच जाणार प्रस्ताव
महापालिका,पाेलिसअायुक्तांशी चर्चा केली असून, प्रलंबित प्रस्ताव लवकरच अंतिम केले जातील. प्रत्येक घाेषणेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न अाहे. - बाळासाहेब सानप, शहराध्यक्षतथा अामदार, भाजप
पुढे वाचा, मुख्यमंत्र्यांचे Promise
बातम्या आणखी आहेत...