आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यातील जिल्हा रुग्णालयात अर्भकांसाठीची ‘सरफॅक्शन इंजेक्शन’च नाहीत, लसींचादेखील तुटवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंभीर परिस्थितीत नवजात बालकांसाठी अतिमहत्त्वाचे असलेले ‘सरफॅक्शन इंजेक्शन’च जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याचबरोबर नवजात बालकांमधील मृत्यू आणि आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच शासनमान्यता असलेल्या खासगी लसीकरण संस्थांमध्ये सर्व नवजात बालकांना जन्मानंतर लगेच अथवा २४ तासांच्या आत हिपॅटायटिस बी, झिरो पोलिओ, व्हिटॅमिन के लसीकरण करणे बंधनकारक असतानाही या अनेक रुग्णालयांत या लस उपलब्ध नसल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, या ‘सरफॅक्शन इंजेक्शन’ची किंमत १२ हजार रुपयांपासून पुढे असल्याने रुग्णालयस्तरावर खरेदी केली जाणे शक्य नसल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी सांगितले. 
 
खासगी रुग्णालयात प्रसूती उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने गोरगरीब कुटुंबांचा आधार असलेल्या राज्यातील एकाही शासकीय रुग्णालयातील नवजात बालक कक्षात व्हेंटिलेटरचा एकही संच उपलब्ध नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर आता नवजात बालकांसाठी महत्त्वाचे असलेले ‘सरफॅक्शन इंजेक्शन’ राज्यातील एकाही रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. कमी वजनाचे नवजात शिशू तसेच वेळेआधीच जन्माला येणाऱ्या बाळांना ‘सरफॅक्शन इंजेक्शन’ द्यावे लागतात. मात्र, ही इंजेक्शन शासकीय रुग्णालयात नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. खासगी रुग्णालयात या इंजेक्शनचे दर तब्बल १२ हजारांपासून पुढे असल्याने अनेकजण हे इंजेक्शन घेणे टाळतात. यामुळे बालमृत्यूसारख्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. 
 
तसेच शासनाने नवजात बालकांमधील आजारांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जन्मानंतर लगेच आवश्यक त्या लसी दिल्या गेल्यास कावीळ, यकृताला होणारे आजार, पोलिओ, रक्तस्राव, क्षयरोगापासून बालकांचे संरक्षण होते. या पार्श्वभूमीवर बालमृत्यू आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी हिपॅटायटिस बी, झिरो पोलिओ, व्हिटॅमिन के, बीसीजी लसीकरण यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व शासकीय रुग्णालये, निमशासकीय रुग्णालये शासनमान्यता असणाऱ्या खासगी लसीकरण संस्थांमध्ये प्रत्येक बालकास उपरोक्त सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या लसीचा साठादेखील जिल्हा रुग्णालयात कमी असल्याचे समोर आले आहे. 
 
महागडे इंजेक्शन उपलब्ध नाहीच 
जिल्हा रुग्णालयात ‘प्री-मॅच्युअर’ बाळांना लागणारे ‘सरफॅक्शन इंजेक्शन’ नाशकात काय राज्यातील कुठल्याही जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाही. या एका इंजेक्शनची किंमत १२ हजारांपासून पुढे आहे. त्याची खरेदी करण्याचे अधिकार सिव्हिल सर्जनलाही नाही. 
- डॉ. जी. एम. होले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
 
बातम्या आणखी आहेत...