आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राम स्वच्छता ठेक्याची नाकेबंदी, आरोग्यधिकारी ठरावानंतर घेणार आयुक्तांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्राम स्वच्छतेचा ठेका काळ्यायादीत असलेल्या वॉटरग्रेसकडून काढून क्रिस्टलला देण्याचा वाद अद्यापही कायम असून, आता दुसऱ्या क्रमांकावरील ठेकेदाराला काम देण्यातील तांत्रिक अडचणी तपासण्यासाठी आरोग्यधिकाऱ्यांकडून आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. थोडक्यात, पुन्हा एकदा स्थायी विरुद्ध प्रशासनातील वादात स्वच्छतेचे काम लांबणीवर पडणार असून, या काळात अन्य ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या स्वच्छतेच्या माध्यमातून त्रयस्थांच्या फायद्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिनाभरापासून सुरू असलेल्या साधुग्रामच्या वादग्रस्त ठेक्याचा निकाल गुरुवारी (दि. ६) स्थायी समितीने लावला. सर्वात कमी दराची, परंतु ३५ टक्के जादा दराची असलेली वॉटरग्रेसची निविदा स्थायी समितीने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या पत्राचा आधार घेत फेटाळली. कामाचा कालावधी सुरू झाल्यामुळे फेरनिविदा काढण्यासाठी वेळ नाही, तर दुसरीकडे पहिला ठेकेदार काळ्यायादीत असल्याचे कारण देत दुसऱ्या क्रमांकावरील ठेकेदाराला पहिल्यापेक्षाही कमी दराने काम देण्याचा ठराव स्थायी समितीने केला. आता हा ठराव आरोग्य विभागाने अप्राप्त असल्याचे कारण देत तत्काळ कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला. दुसरीकडे स्थायी समितीकडून सायंकाळी ठराव पाठवला गेल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, यासंदर्भात आरोग्यधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना विचारले असता त्यांनी ठराव अप्राप्त असल्याचे सांगत प्राप्त झाल्यानंतरही आयुक्तांकडे योग्य निर्णयासाठी सादर केला जाणार आहे. त्यामुळे आता प्रशासकीय प्रक्रियेत पुन्हा एकदा स्वच्छतेचे काम रखडणार असून, या सर्वात पर्यायी व्यवस्था म्हणून ज्यांना काम दिले आहे, त्यांचे उखळ मात्र पांढरे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात आता स्थायीचे सदस्य एकत्र येताना दिसत आहेत.
शिवसेना धरणार प्रशासनाला जबाबदार
पहिल्या क्रमांकावरील निविदा रद्द करून दुसऱ्या क्रमांकावरील ठेकेदाराला काम देण्याबाबत स्थायी समितीला अधिकारच नसल्याचा दावा करत शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी या प्रकरणी नियमांचे उल्लंघन झाल्यास महापालिका प्रशासन पर्यायाने आयुक्तांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला आहे. ठेकेदाराची वादग्रस्त पार्श्वभूमी सांगतानाच प्रशासनाने अशा पद्धतीने दुसऱ्या क्रमांकावरील ठेकेदाराला काम देता येते की नाही, याबाबत स्पष्ट मत स्थायी समितीला का दिले नाही, असा सवालही त्यांनी केला.
घंटागाडी सेवेवरही येणार गंडांतर
वॉटरग्रेस काळ्या यादीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता स्थायी समिती सदस्यांनी पुढील सभेत घंटागाडी जैविक कचरा संकलनाचे कामही संबंधितांकडून काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मनसेच्या सुरेखा भाेसले, मेघा साळवे, भाजपचे प्रा. कुणाल वाघ आदी पत्राद्वारे मागणी करणार असून, त्यात घंटागाडी जैविक कचरा संकलनाचे काम काळ्या यादीतील ठेकेदाराला देणे योग्य की अयोग्य, असा खुलासा प्रशासनाकडून घेतला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...