आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्ट चौकात दुसऱ्या दिवशी दुकान फोडण्याचा प्रयत्न; शटर उचकवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरट्यांनी टॉमीच्या साह्याने उचकवलेल्या शटरचा भाग (वर्तुळात). तसेच शटरचे लाॅक अधिक मजबूत करून दुरुस्ती करताना कारागीर. - Divya Marathi
चोरट्यांनी टॉमीच्या साह्याने उचकवलेल्या शटरचा भाग (वर्तुळात). तसेच शटरचे लाॅक अधिक मजबूत करून दुरुस्ती करताना कारागीर.
जळगाव- कोर्ट चौकातील वायरलेस मोबाइल दुकान फोडून १६ लाखांचे मोबाइल चोरी करून नेल्याच्या गंभीर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी याच परिसरात असलेल्या कैलास टीव्ही सेंटर या दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दीड महिन्यात या चौकामध्ये चोरी, चोरीच्या प्रयत्नाच्या चार घटना घडल्या असून अद्याप एकही गुन्ह्यात चोरटे सापडलेले नाहीत. मध्यवस्तीत असलेल्या कोर्ट चौकात रात्री उशिरापर्यंत बऱ्यापैकी वर्दळ असते. पोलिसांची गस्ती पथकेही फिरत असतात. तरीही दुकाने फोडण्याच्या घटना घडत असल्याने चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे दिसत आहे. 
 
जे.टी.चेंबर येथे असलेले वायरलेस मोबाइल वर्ल्ड या राजेंद्र बारींच्या दुकानातून गुरुवारी रात्री चाेरट्याने १६ लाख रुपयांचे मोबाइल चोरून नेले. भरचौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या या दुकानात चोरी झाल्यामुळे पोलिस यंत्रणेचे वाभाडे निघत असतानाच शनिवारी पुन्हा एक झटका बसला. शुक्रवारी रात्री पुन्हा चोरट्यांची याच परिसरातील जयकिसन वाडीतील कैलास टीव्ही सेंटर या दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने दुकानाचे शटर उघडल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. मूळचे भुसावळ येथे राहणाऱ्या प्रकाश कृपालानी यांच्या मालकीचे हे दुकान आहे. भुसावळहून अप-डाऊन करून ते जळगावात टीव्ही, फ्रीज, मोबाइल आदी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. शुक्रवारी रात्री वाजता दुकान बंद करून कृपालानी त्यांचे चिरंजीव सुनील कृपालानी हे भुसावळला निघून गेले. त्यानंतर शनिवारी सकाळी वाजता कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आला असता, त्याला शटर वाकलेले दिसले. त्याने तत्काळ फोन करून कृपालानी यांना माहिती दिली. दुकानाचे मुख्य शटर टॉमीच्या साह्याने उचकवलेले आढळले. मात्र, शटर उघडले नाही किंवा शेजारील नागरिकांच्या अावाजाने चोरट्यांनी पळ काढल्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली नसल्याची माहिती सुनील कृपालानी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. 
 
घटनास्थळी आले बॉम्ब शोध पथक 
तिवारी यांनी शहर पोलिस स्टेशनसह पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बेवारस कटर टॉमी मिळाल्याची माहिती दिली होती. मात्र, नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या ऐकण्यात काहीतरी गल्लत झाली. त्यामुळे त्यांनी श्वानपथक पाठवता चक्क बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) पाठवले. त्यामुळे नेहरू चौकात बॉम्ब शोध पथकास पाचारण केल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. दरम्यान, कैलास तिवारी यांच्या दुकानाजवळ मात्र, कटर आणि टॉमी सापडल्याने नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. 
 
दरम्यान, गुरुवारी रात्री बारी यांच्या दुकानातील चोरी तर शुक्रवारी रात्री कृपालानींच्या दुकानातील चोरीच्या प्रयत्नानंतर शनिवारी सकाळी १० वाजता नेहरू चौकातील मोहिनी पुस्तक भांडार या पुस्तक विक्रीच्या दुकानाजवळ एक मोठे लाेखंडी कटर टॉमी आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. दुकान मालकांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी करत टॉमी कटर ताब्यात घेतले. मोबाइल दुकान फोडण्यासाठी याच टॉमीचा वापर केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. परंतु दोन्ही अवजारे तपासणीत नवे असल्याने ते वापरलेच गेले नसल्याचीही माहिती समोर येते आहे. बारी यांच्या दुकानाचे शटर सहा ठिकाणी कापण्यात आले आहे. अशा प्रकारे शटर कापण्याचेच हे कटर असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. त्यांनी परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कैलास अंबिकाप्रसाद तिवारी यांच्या पुस्तक भांडारजवळ हे कटर टॉमी मिळून आले आहे. बारी यांच्या दुकानात चोरी झालेली असल्यामुळे हे कटर टॉमी संशयितांनी वापरले असल्याच्या संशयावरून तिवारी यांनी शहर पोलिस ठाण्याचे डीबी कर्मचारी दुष्यंत खैरनार संतोष भालेराव यांना माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही अवजारे जप्त केली आहेत. शोध घेण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. 
 
दोन पोलिस ठाण्यांची सीमारेषा असूनही मध्यवर्ती भाग असुरक्षित 
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी, दुकानदार धास्तावले 
नवीपेठ,जयकिसनवाडी, कोर्ट चौक, टॉवर ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणे आहेत. कोर्ट चौकात दोन पोलिस ठाण्यांची हद्द विभागली जाते. अशा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हापेठ शहर या दोन पोलिस ठाण्यांची ‘बॉर्डर’च असुरक्षित असल्याचे गेल्या दोन महिन्यांपासून दिसून येते आहे. दोन महिन्यांत पाच वेळा या भागात चोरी चोरीच्या प्रयत्नांच्या घटना घडल्या आहेत. 
 
कोर्ट चौकात शहर जिल्हापेठ पोलिस ठाण्याची सीमारेषा आहे. विशेष म्हणजे, ‘हार्ट ऑफ सिटी’ म्हणून हा भाग ओळखला जातो. याच मार्गावर रेल्वेस्थानक असल्यामुळे रात्रभर प्रवासी, रिक्षा ये-जा करीत असतात; पण नेमकी याच वेळी पोलिसांची गस्त होत नसल्याचे आता घटनांवरून लक्षात येते आहे किंवा गस्त होत असेल तरी, त्यात गांभीर्य नसल्यामुळे चोरट्यांनाही पोलिसांचा धाक उरलेला नाही. बिनदिक्कतपणे चोरटे मुख्य रस्त्यांवरील दुकाने फोडून हात साफ करीत आहेत. 
 
यापूर्वी पोलिस ठाण्यांचा हद्दवाद उपनगरांमध्ये पाहण्यास मिळत होता. जिल्हापेठ शहर पोलिस ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असूनही समन्वयाचा अभाव किंवा रात्रीच्या गस्तींची औपचारिकता या प्रकारच्या गुन्ह्यांना पोषक ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम येथील दुकानदार, व्यापारी, रहिवाशांना भोगावा लागतो आहे. एक प्रकारे चोरट्यांसाठी हा भाग ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणूनच पुढे येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 
 
गस्तीसाठी कर्मचारी वाढवून दिले 
-सातत्याने घडणाऱ्या घटनांसंदर्भात सर्व पाेलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीची गस्त चोखपणे व्हावी यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला ३-४ वाढीव कर्मचारी देण्यात आले आहेत. मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक, जळगाव 
 
रात्रीच्या वेळी डीबी कर्मचाऱ्यांनी फिरणे अपेक्षित 
सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील डीबी (गुन्हे शोध) पथकातील कर्मचाऱ्यांनी चोखपणे रात्रीच्या गस्त करणे अपेक्षित आहे. त्यांच्या कामाचे नियंत्रण थेट पोलिस उपअधीक्षकांकडे देण्यात आले. यासंदर्भात दोन-तीन बैठकाही घेण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ पातळीवरून डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अपेक्षित काम करण्याचे वारंवार सांगितले जात असूनही शहरातील काही भागात सातत्याने चोरी, घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. 
 
एकाच परिसरात दोन महिन्यांत पाच घटना 
फेब्रुवारी : कोर्ट चौकातील राजेश पाटील यांच्या संजीवनी मेडिकलमध्ये चोरी; ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास. 

२२फेब्रुवारी : शिवतीर्थमैदानाच्या अगदी समोर असलेल्या विश्वास दीक्षित यांच्या अंतरिक्ष भवन या दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न. 
 
मार्च: शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या एका दवाखान्यात जाण्यासाठी खोटेनगर येथील मनोज मराठे यांनी चारचाकी (क्र.एमएच-१९/एवाय-८८९१) उभी केली. १५ मिनिटांच्या आत या चारचाकीची काच फोडून आत ठेवलेले सोने, रोख रक्कम लॅपटॉप असा ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. 
 
एप्रिल: जे.टी.चेंबरमधील वायरलेस वर्ल्ड नावाच्या मोबाइल दुकानाचे शटर उचकवून चोरी; यात १६ लाख रुपयांचे मोबाइल लंपास. 

एप्रिल: जयकिसनवाडीतील कैलास टीव्ही सेंटरचे शटर उघडण्याचा प्रयत्न. 
बातम्या आणखी आहेत...