आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक बनून स्वतःच इतरांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करा- डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक - जागतिकीकरणाच्या आजच्या काळात निर्माण झालेली स्पर्धा आणि त्यातून वाढत जाणारी बेरोजगारी लक्षात घेता, सर्वांना सरकारी नोकरी मिळणे अवघड आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे लागता, स्वतः उद्योजक बनून इतरांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करा, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी केले. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ‘जेआयटी’ इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य. डॉ. एम. व्ही. भटकर होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. चेतन पाटील, प्रा. हेमंत बडोदेकर, प्रा. गीतांजली मोहोळे, प्रा. स्वाती थेटे, प्रा. देवीदास पाटील, प्रा. अभिजित पवार, प्रा. पंकज बडगुजर, प्रा. सागर अस्वार आणि यूआर वैभव रोकडे उपस्थित होते. 
 
पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, आई, वडील, शिक्षक आणि राष्ट्र यांचा नेहमी सन्मान करा. यांनीच तुमच्या जीवनाला आकार दिला आहे. तुमचे जीवन खऱ्या अर्थाने आता सुरू झाल्याने, या देशाची प्रगती तुमच्या हातात आहे. जीवन जगत असतांना जीवनाच्या शेवटापर्यंत विद्यार्थी म्हणून जगा. ज्या वेळी आपण ज्ञानग्रहण करणे सोडतो, त्यावेळी आपला बौद्धिक अंत होतो. 
 
व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे एखाद्या ठिकाणाला प्रसिद्धी मिळते, ठिकाणामुळे व्यक्तीला प्रसिद्धी मिळत नाही. यामुळे तुमचे कर्तृत्वच तुमची खरी ओळख बनणार आहे. प्राचार्य. डॉ. एम. व्ही. भटकर यांनीही स्नातकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाखा भदाणे यांनी केले. आभार प्रा. चेतन पाटील यांनी मानले. 
 
यावेळी कॉलेजच्या कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हिल आणि अँड टीसी या विभागातील १०२ स्नातकांना पदवी देण्यात आली. पदवीग्रहण केल्यावर स्नातकांनी सेल्फी काढून एकच जल्लोष केला. काहींनी ग्रुप्सने तर प्राध्यापकांबरोबर सेल्फी घेतला. स्नातकांबरोबर त्यांचे पालकही उपस्थित होते. काहींनी आपल्या आई-वडिलांच्या हातात पदवी देऊन तर काहींनी त्यांच्या डोक्यात कॅप घालून आनंद साजरा केला. यावेळी कॉलेजचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...