आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच धरणांत अवघा तीन टक्के साठा, मृतसाठ्यावर भागवावी लागेल तहान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - तालुक्यातील पाचही धरणातून अवैध पाणी उपसा सुरूच असून, तो थांबविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने तालुक्यात अवघा तीन टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. आठवडाभरात हा साठाही संपुष्टात येण्याची चिन्हे असल्याने केवळ मृतसाठ्यावर योजना चालवाव्या लागणार आहेत. झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन जागे झाल्यास मृतसाठाही संपुष्टात येऊन तालुक्यातील पाणीयोजना अडचणीत येण्याची भीती ग्रामस्थांना सतावू लागली आहे. 
भोजापूर, कोनांबे, बोरखिंड, ठाणगाव, सरदवाडी ही धरणे ऑगस्टमध्येच ओतप्रोत भरली होती. याशिवाय देवनदीद्वारे तब्बल पाच दशलक्ष घनमीटर इतके पाणी वाहून गेले. सरासरीहून अधिक पाऊस पडल्याने मुबलक पाणीसाठे झाले होते. तथापि, धरणांतील पाणी ज्या गतीने खालावले त्याकडे पाहता प्रशासनाच्या पाठबळामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाला आहे. सरदवाडी, कोनांबे धरणातील उपशाबाबत ग्रामपंचायतींनी लेखी तक्रार केल्यानंतर वरवरची कारवाई झाली. तथापि, त्यामुळेही अवैध पाणी उपसा थांबला नाही. 
 
कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी झाली. दिवसरात्र झालेल्या पाणी उपशाने धरणांचे पितळ उघडे पडले असून, पाऊस लांबल्यास तालुक्यावर जलसंकट ओढवणार आहे. पाणी उपसा थांबविण्यासाठी कडक धोरणाचा अवलंब होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यानेच पाणीसाठे झपाट्याने कमी झाले आहेत. 

महिनाभरात४४ दशलक्ष घनफूट साठा संपुष्टात 
२७मार्चला तालुक्यात ६३.६५ दशलक्ष घनफूट उतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. अवघ्या महिनाभरात तो १८.८ दशलक्ष घनफूट इतक्यापर्यंत खालावला आहे. भोजापूरसह बोरखिंड, कोनांबे, ठाणगाव, सरदवाडी धरणातून तब्बल ४४.८५ दशलक्ष घनफूट इतके पाणी कमी झाले. यातील बाष्पीभवन झालेले पाणी वगळले तरीही दिवसाला एक दशलक्ष घनफूट पाण्याची चोरी झाल्याचेच समोर आले आहे. 

‘दिव्यमराठी’चा पाठपुरावा 
अवैध पाणी उपसा होत असल्याने पाणीसाठे खालावल्याची चिंता ‘दिव्य मराठी’ने व्यक्त केली होती. याबाबत २७ मार्चला ‘अवैध उपसा सुरू, धरणांत केवळ ११ टक्केच पाणीसाठा’ या मथळ्याखाली सविस्तार वृत्त प्रसिद्ध केले होते. धरणातील पाण्याची उधळपट्टी थांबविण्यास प्रशासन फारसे उत्सुक दिसत नसल्याची बाब स्पष्टपणे मांडली होती. त्यामुळे उपयुक्त साठे संपुष्टात आल्याचे महिनाभरानंतर लगेचच स्पष्ट झाले आहे. 

कारवाई केली होती 
^१५ दिवसांपूर्वीच धरण क्षेत्रात कारवाई करण्यात आली होती. पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे धोरण आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगण्यात येईल. -महेश पाटील, उपविभागीय अधिकारी, निफाड 

पाणीकपात केली आहे 
^सरदवाडीधरणकोरडे पडल्याने लोणारवाडीच्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. ग्रामपंचायतीने पाणी उपशाबाबत पत्र दिले होते. त्याची दखल घेण्यात आली नाही. मे मध्येच टंचाई भासण्याची स्थिती आहे. -राजेंद्र भगत, उपसरपंच, लोणारवाडी 

अपयशाचे खापर जलयुक्तच्या कामांवर 
सरदवाडी धरणातून दीड हजारावर डंपर गाळाचा उपसा करण्यात आला. कोनांबे धरणातूही गाळ उपसण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही धरणात प्रत्येकी दोन दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्याची भर पडली होती. धरणांतील पाणीसाठे कमी झाल्याची दोन कारणे पाटबंधारे विभागाकडून दिली जात आहेत. जलयुक्तच्या कामांत प्रमाणापेक्षा खोलवर गाळाचा उपसा करण्यात आल्याने जमिनीखालून पाणी वाहून गेले. तर उष्णतेच्या लाटेने बाष्पीभवन झाले. तथापि, जलयुक्तमुळे पाणी वाहून गेल्याचे कारणाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर बाष्पीभवनाने पाणीसाठे झपाट्याने कमी होऊ शकत नाही. कारणे काहीही सांगितली जात असली तरी पाणी उपशाविरोधात महसूल, वीज महावितरण पाटबंधारे विभागाने धडक मोहीम हाती घेतल्यानेच साठे संपुष्टात आल्याचे चित्र आहे. 

३६ गावांवर जलसंकट 
भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह गावे, उंबरदरी धरणावर ठाणगावसह पाच गावे, सरदवाडी धरणावर चार गावे, बोरखिंड धरणावर चार गावे अवलंबून आहेत. सध्याचा शिल्लक साठा पाहता जूनअखेरपर्यंत या गावांना पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. मृतसाठ्याचा उपसा पूर्णपणे थांबविल्यास कपातीसह योजना जूनअखेरपर्यंत तग धरू शकतील. अन्यथा या गावांना टँकरची वाट पहावी लागेल. 

गतवर्षाच्या तुलनेत सात टक्के घट 
२७एप्रिल २०१५ ला तालुक्यात १०.५ टक्के जलसाठा होता. गतवर्षी पाऊस कमी पडूनही धरणात १०.१९ टक्के साठा शिल्लक होता. दोन्ही वर्षी सरदवाडी धरण वगळता चार धरणात उपयुक्त साठे शिल्लक होते. यंदा भोजापूर वगळता बोरखिंड, कोनांबे, ठाणगाव या धरणात मृतसाठे शिल्लक आहेत. तथापि, हे साठेही तुलनेने मोठ्या प्रमाणात घटले आहेत. तर सरदवाडी धरण कोरडे पडले आहे. 

धरणांची उपयुक्त साठा स्थिती (दलघफू, २७ एप्रिल) 
धरणआजचा २०१६ चा २०१५ चा मृतसाठा क्षमता साठा साठा साठा 
भोजापूर १५ ०९ ०४ १०.७ ३६१ 
ठाणगाव ०० ०.१५ ०२ १७.१० ४३.२० 
सरदवाडी कोरडे ०० १.५ ११.७८ ७७ 
कोनांबे ०० ०.०७ ०० ७.५० ४७ 
बोरखिंड ०.०८ ०.३४ ०३ ५.० ५०.३१ 
 
बातम्या आणखी आहेत...