आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील उद्रेकाची सीआयडी चौकशी करा, आनंदराज आंबेडकर यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगाव येथील पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक अशा घटना घडल्या असून, त्यातून जातीय तेढ निर्माण केला गेला आहे. त्यामागील सूत्रधाराचा शोध घेण्याऐवजी पोलिसांकडून निरपराध लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे या सर्व घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.

तळेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांनी रविवारी (दि. १६) जिल्हा रुग्णालयात पीडित चिमुरडी व पालकांची भेट घेतली. तसेच या दंगलीमध्ये जखमी झालेल्यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तळेगावची घटना दुर्दैवी अाहे. मात्र, या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर काहींकडून जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्यात आली. त्यामुळे अनेक गावांमध्ये दलित व मराठा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. पोलिसांकडून योग्य कारवाई व संरक्षण दिले न गेल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यातच आता पोलिसांकडून कारवाई होत असून, निरपराध लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी या वेळी केला. सामाजिक अशांतता पसरवण्यास काही मंत्र्यांचे वक्तव्य कारणीभूत ठरले. मात्र, सध्या जे राजकीय हेतूने प्रेरित आरोप-प्रत्यारोप होत आहे, त्यापेक्षा या दंगलीची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी ही चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.
तर उच्च न्यायालयात दाद मागू
तळेगावच्या घटनेनंतर काही गावांमध्ये दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा व शांतता प्रस्थापित राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यायग्रस्त दलितांना न्याय मिळत नसेल तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली जाईल, असेही आंबेडकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...