आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीने झाले नुकसान; काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाबंदीने झालेल्या जनतेच्या नुकसानाची भरपाई मिळावी, यासाठी काँग्रेसने शुक्रवारी शहरातून मोर्चा काढला होता. - Divya Marathi
नोटाबंदीने झालेल्या जनतेच्या नुकसानाची भरपाई मिळावी, यासाठी काँग्रेसने शुक्रवारी शहरातून मोर्चा काढला होता.
नाशिक - केंद्र सरकारच्या फसलेल्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल झाले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयातून कुठलाही काळा पैसा बाहेर आला नसून, यात केवळ जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप करत रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून झालेल्या नुकसानाची भरपाई सर्वसामान्यांना देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. 
 
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेल्या नोटाबंदीचे सर्जिकल स्टाइक फसल्यामुळे केंद्र शासनाने मोठ्या खुबीने नोटाबंदीचा निर्णय हा कॅशलेसकडे वळविला. मात्र, यात मुख्य उद्देश मागे पडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नोटाबंदीने जनतेचे मोठे नुकसान झाल्याने सर्वसामान्यांचा आवाज म्हणून नोटाबंदीविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. यातील पहिल्या टप्प्यात शुक्रवारी काँग्रेस कमिटीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, के. सी. पाडवी, समन्वयक डॉ. कमलेश चौधरी, प्रभारी डी. डी. पाटील, आमदार निर्मला गावित, प्रदेश सचिव अविनाश रामिष्टे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते, उत्तमराव कांबळे, अॅड. आकाश छाजेड, वत्सला खैरे, डॉ. ममता पाटील, साधना जाधव, लक्ष्मण जायभावे, राहुल दिवे, राजेंद्र बागुल, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, बबलू खैरे, डॉ. सुचेता बच्छाव, ज्युली डिसोजा, संदीप शर्मा, सुनील आव्हाड, प्रकाश शिंदे, नितीन काकड, नंदकुमार कर्डक, संतोष लोळगे, मुन्ना ठाकूर, वंदना पाटील, राजेंद्र वढरे, सुरेश शिंदे, शोभा गोंदणेकर आदी सहभागी झाले होते. 

वाहतूक व्यवस्था विस्कळीत 
काँग्रेसच्याआंदोलनामुळे एम. जी.रोडसह शहरातील विविध भागांतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली दिसत होती. मोर्चा मार्गावर संपूर्ण ट्रॅफिक जाम झाली होती. तर, सीबीएसवर जिल्हाधिकारी कार्यालयावरदेखील मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यामुळे सामान्यांचे हाल झाले. 

‘ग्रामीण’ची गर्दी 
आंदोलनात शहरापेक्षा ग्रामीण कार्यकर्त्यांचीच मोठी गर्दी होती. बहुतांश नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. शहरातील बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते आंदोलनात दिसत होते. ग्रामीण काँग्रेसमधून नाशिक, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी भागातून मात्र मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

 
बातम्या आणखी आहेत...