आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहक-व्यापाऱ्यांना बक्षिसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नोटाबंदीनंतर कॅशलेसचा पुढाकार शासनाने घेतला असून, जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करणाऱ्या नशीबवान ग्राहकांना एकूण एक कोटी रुपयांपर्यंतची, तर व्यापाऱ्यांना स्वतंत्रपणे ५० लाखांपर्यंतची पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी डिजिधन मेळाव्याच्या अायोजनपूर्व तयारीच्या बैठकीत शुक्रवारी दिली. 
नीती आयोगाच्या सूचनेनुसार फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीस नागरिकांना कॅशलेस व्यवहाराची माहिती देण्यासाठी डिजिधन मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तो यशस्वी करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारासंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात करण्यात येत आहे. 
 
मेळाव्याला केंद्र राज्यातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांसाठी आधार नोंदणी, बँक खात्याशी आधार कार्ड किंवा मोबाइल क्रमांक संलग्न करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बँकांनी मेळाव्यात स्टॉल लावून नवीन खाते उघडणे, डिजिटल व्यवहाराच्या मोबाइल अॅपची माहिती देणे, रुपे कार्ड वाटप, व्यापारी संघटनांकडून पीओएस मशीनची मागणी नोंदविणे, एईपीएसची माहिती देणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. डिजिधन मेळाव्याच्या ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी एअरटेल आणि बीएसएनएलचे सहकार्य मिळणार आहे. डिजिटल व्यवहाराबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसनदेखील बँकांच्या प्रतिनिधींमार्फत करण्यात येणार आहे. विविध अॅप डाऊनलोडची व्यवस्थाही उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती रामदास खेडकर यांनी दिली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार सी. एस. देशमुख, लिड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, बीएसएनएलचे व्यवस्थापक सुरेशबाबू प्रजापती आदी उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...