आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखलखाट... राेषणाई... अन‌् अातषबाजीत लक्ष्मीपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लक्ष्मीपूजनाचे अाैचित्य साधून शहरातील प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक पेढ्यांसह घराेघरी माेठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यात अाले. दुपारपासून सुरू झालेले फटाक्यांचे अावाज अाणि सायंकाळच्या राेषणाईसह नयनरम्य राेषणाईने उजळून गेलेले अाभाळ अशा वातावरणात दीपाेत्सव पर्वातील सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाचा साेहळा पार पडला.
असंख्य दीप रोषणाईचा झगमगाट, फुलांची तोरणे, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि सायंकाळच्या अमृतवेळी मांगल्य आणि भक्तिभावाच्या सुगंधी वातावरणात घराघरांत, कार्यालयात तसेच उद्योग-व्यवसायाच्या ठिकाणी वैभव, सुख-समृद्धी आणि भरभराटीचे दान देणाऱ्या श्री लक्ष्मीचे स्वागत करून पारंपरिक थाटात विधिवत पूजन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आवाजाचा दणदणाट सुरू होता. यानिमित्ताने आनंदोत्सवाला उधाण आले होते. दीपावलीच्या उल्हासी पर्वात अनन्यसाधारण महत्त्व असलेले लक्ष्मीपूजन रविवारी शहरात सर्वत्र उत्साहात झाले. लक्ष्मी, कुबेर आणि सरस्वतीचे विधिवत पूजन झाल्यानंतर शहरात सायंकाळी प्रकाशाच्या उत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. सायंकाळपासून सुरू झालेल्या अाकाशबाणांसह रंगीबेरंगी नयनरम्य आतषबाजीने रात्री उशिरापर्यंत सारे आसमंत उजळून निघाले होते. धनाचे प्रतीक असलेले धने, समृद्धीचे प्रतीक असलेल्या लाह्या, गूळ, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवत लक्ष्मीची प्रार्थना करण्यात आली. नवीन झाडू-केरसुणीचेही पूजन करण्यात आले.

व्यापारी पेढ्यांसह विविध अास्थापनांमध्ये पूजन
बाजारपेठांतीलव्यापारी पेढ्यांवर जमा-खर्चाच्या, कीर्द खतावणीच्या नवीन वह्यांची पूजा करण्यात आली. त्याशिवाय महानगरातील विविध अास्थापनांवरदेखील दुपारी अाणि सायंकाळी लक्ष्मीपूजन करण्यात अाले. सोशल नेटवर्किंग साइट्स, व्हॉट्सअॅपद्वारे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा सिलसिला दिवसभर सुरू होता. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी शहरातील देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...