आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट साधूंना पदव्या देणारे नरेंद्रगिरी भूमाफिया, महंत राजेंद्रदास महाराज यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-गुरुचरणी एका तपाची साधना केल्यानंतर शिष्याला धर्म परंपरेची सेवा करण्यासाठी पदवी बहाल केली जाते. वैष्णवांमध्ये अनादी काळापासून ही परंपरा चालत आली आहे. मात्र, लाखो रुपये घेऊन कोणालाही महामंडलेश्वर यासह इतर धार्मिक पदव्यांची खैरातच जणू नरेंद्रगिरी महाराज वाटत आहेत. भक्तिमार्गाच्या नावाखाली जमिनी बळकावणारे नरेंद्रगिरी हे खरे भूमाफिया असल्याचा पलटवार निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास महाराज यांनी शुक्रवारी केला.

अखिल भारतीय श्री पंच निर्मोही आखाडा, निर्वाणी आखाडा आणि दिगंबर या तिन्ही आखाड्यांचे प्रमुख आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज हेच असल्याचा पुनरुच्चार राजेंद्रदास महाराजांनी केला. निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्रगिरी यांनी चारित्र्यहीन व्यक्तींकडून लाखो रुपयांच्या देणग्या स्वीकारून त्यांना महत्त्वाच्या पदव्या बहाल केल्याचा आरोपही त्यांनी केला.

राधे माँने दिले होते पैसे
भक्तगणांकडून पैसे घेणाऱ्या राधे माँ हिनेदेखील मंडलेश्वर होण्यासाठी पैसे दिले होते. या काळ्या पैशातूनच त्यांनी अनेक ठिकाणी जमिनी मिळविल्या. ‘सच्चितानंद’ हा याच व्यवस्थेचा भाग असून त्यांचे कारनामे उघड झाल्यानंतर नरेंद्रगिरींना त्यांची पदवी रद्द करावी लागली, असे मतही राजेंद्रदास महाराज यांनी व्यक्त केले.

शंकराचार्यांकडून भक्तांचा अपमान
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहेत. शिर्डीचे साईबाबा हे कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. साईंच्या चरणी आस्थेने लाखो भाविक येत असतात, परंतु साईबाबांविरोधात चुकीचे बोलणाऱ्या शंकराचार्यांनी कोट्यवधी साईभक्तांचा अपमान केला आहे. त्यांना महाराष्ट्रातील कुंभमेळ्यात येण्यास बंदी घालण्याची गरज आहे, असे परखड मतही राजेंद्रदास महाराज यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...