आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादीला फाटा; एेनवेळी एबी फाॅर्म देण्याची शिवसेना, भाजपची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक -शिवसेना भाजपच्या उमेदवारी याद्या जाहीर करण्यास गुरुवारीही मुहूर्त लागला नाही. हे दाेन्ही पक्ष यादी जाहीर करताच उमेदवारांना थेट एबी फाॅर्म देऊन अंतर्गत बंडखाेरी टाळतील, अशी शक्यता अाहे. असे झाल्यास उमेदवारी याद्या जाहीर करण्याची ही पहिलीच निवडणूक ठरणार अाहे. उमेदवारी निश्चित असलेल्यांना याबाबतची माहिती कानात देत ‘कामाला लागा’चा संदेश देण्यात अाला अाहे.
 
 दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीबाबत रात्री उशिरापर्यंत नाशिक-पुणे रोडवरील एका हॉटेलात काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी भाई जगताप यांच्या उपस्थितीत खल सुरू हाेता. प्रभाग १२ १६ मधील एक जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा झाला आहे. प्रसंगी स्वतंत्ररित्या सर्व जागा लढविण्याची तयारीही झाली. त्यामुळे या पक्षांचीही यादी जाहीर झाली नाही. मनसेने मात्र अाघाडी घेत ५४ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. 
 
शिवसेनेत ८१० इच्छुकांनी तर भाजपमध्ये ६९० इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, प्रत्यक्षात प्रत्येकी १२२ उमेदवारांनाच तिकीट मिळणार अाहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते अन्य पक्षाचा रस्ता धरू शकतात या भीतीने उमेदवारी याद्या जाहीर करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे राजकीय हालचालींवरून दिसते. पक्षाचे नेते राेजच यादीचा मुहूर्त उद्या असल्याचे सांगत अाहेत. मात्र, काेणाचाही उद्या अद्याप उगवलेला नाही. भाजप अाणि शिवसेनेची यादी शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात येईल असे सांगितले जात अाहे. 
 
मात्र, प्रत्यक्षात यादी जाहीर करता उमेदवारांना थेट एबी फाॅर्म देऊन त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामाेर्तब केला जाण्याची शक्यता अाहे. शेवटच्या क्षणी एबी फाॅर्म दिल्यास अन्य नाराज उमेदवारांना दुसऱ्या पक्षात जाण्याची संधीच उरणार नाही असे खलबतेही रचली जात अाहेत. तसेच उमेदवारी निश्चित झालेल्या इच्छुकांना याबाबतची माहिती वैयक्तिकरित्या देण्यात अाली. काही ठिकाणी उमेदवारांचे एेनवेळी स्थलांतरही करण्यात अाले अाहे.
 
ही रात्रही ठरली वैऱ्याची! 
अाजवर मतदानापूर्वीची रात्र वैऱ्याची असल्याचे समजले जायचे. यंदा मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीची रात्र नेतेमंडळींसाठी वैऱ्याची ठरली. रात्री उशिरापर्यंत उमेदवारी वाटपाचा गाेंधळ सुटत नव्हता. त्यातच नाराज हाेणाऱ्यांचा राेष वाढत हाेता. त्यामुळे अापसुकच नेत्यांना एकटे बाहेर फिरणेही जिकिरीचे झाले हाेते. 
 
इंजिन उरले, डबे गुल... 
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्वाधिक इच्छुक भाजप अाणि शिवसेनेकडेच असल्याने काही प्रमाणात बंडखाेरीची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. या बंडखाेरीचा थाेडाफार फटका बसेल; मात्र त्याला काही पर्याय नाही, असे सांगतानाच इतर पक्षांच्या स्थितीबाबत ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीला तर कुणीच विचारत नसल्याची स्थिती अाहे. मनसेची अवस्था तर सर्वाधिक बिकट असून त्यांच्या गाडीचे केवळ इंजिनच उरले असून, डबे गुल झाले अाहेत. 
 
प्रत्येकाला शब्द दिल्याने अडचणीत वाढ 
शिवसेना अाणि भाजपमध्ये प्रत्येक इच्छुकाला स्थानिक नेत्यांनी ‘शब्द’ दिला अाहे. त्यामुळे काही दिवसांपासून ही सगळी मंडळी प्रचारासाठी अापापल्या प्रभागात जंग जंग पछाडत अाहेत. एका-एका प्रभागात ३० ते ३५ इच्छुक अाहेत. यापैकी प्रत्येक पक्षाकडून प्रत्येकी चार उमेदवारांनाच संधी मिळणार अाहे. त्यामुळे माेठ्या प्रमाणात नाराजी पसरण्याची शक्यता अाहे. त्यातच स्थानिक नेत्यांनी इच्छुकांचे माेबाइल उचलणेच बंद केल्याने संतापात वाढ हाेत अाहे. 
 
 
भाजपमध्ये तर अाता नाकारल्या जाणाऱ्या इच्छुकांना दुसऱ्या नेत्यांच्या घरांचा रस्ता दाखविला जात अाहे. एका अामदाराकडे इच्छुक गेल्यास त्याला ‘तुझे काम मध्य नाशिकमधील अामदारच करू शकतात’ किंवा ‘पश्चिम मतदारसंघातील अामदारच करू शकतात’ असे सांगितले जात अाहे. त्यामुळे ‘बिचारा’ इच्छुक सध्या सांगितला जाईल ताे मार्ग पत्करून नेत्यांच्या घरांच्या खेटा मारताना दिसत अाहे. या ‘कातडी बचाव’ धाेरणाचा अवलंब करताना ‘वाईटपणा’ घ्यायला मात्र काेणी तयार नसल्याचे दिसते. 

अादित्य ठाकरे यांचा दाैरा लांबणीवर 
शिवसेनेचे युवा नेते अादित्य ठाकरे यांचा गुरुवारी दाैरा हाेणार हाेता. यावेळी सेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन करतानाच सिडकाे अाणि सातपूरमध्ये सभाही अायाेजित करण्यात अाल्या हाेत्या. तसेच सेनेच्या प्रचाराचे नारळ ठाकरे यांच्या हस्ते फुटणार हाेते. प्रत्यक्षात उमेदवारी यादीच जाहीर केल्याने ठाकरे यांचा दाैरा लांबविण्यात अाला.
 
ज्येष्ठता की सक्षमता? 
बरेच इच्छुक पक्षातील ज्येष्ठतेच्या मुद्यावर उमेदवारी मागत अाहेत. मात्र, निवडणूक येण्याच्या क्षमतेबाबत शंका अाहे. काही इच्छुक पक्षात नवे अाहेत, मात्र त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता अाहे. असे दाेन्ही प्रकारचे इच्छुक उमेदवारीसाठी अाग्रही असल्याने पक्षश्रेष्ठींना निर्णय घेणे अवघड हाेत असल्याचे गुरुवारच्या दिवसभरातील हालचालींवरून दिसते. 
बातम्या आणखी आहेत...