आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी शाळेतूनच, अशी होईल प्रवेशप्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीची प्रवेशप्रक्रिया यंदा प्रथमच केंद्रिभूत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाच फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. शिक्षण विभागातर्फे प्रवेशप्रक्रियेसाठीची तयारी पूर्ण झाली असून दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका वितरित केल्या जाणार अाहेत. त्यानंतर शाळेतूनच ऑनलाइन प्रवेशासाठी प्राथमिक नोंदणी सुरू होईल. तर शहराबाहेरील विद्यार्थ्यांसाठी पाच विभागनिहाय मार्गदर्शन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. 
 
दहावीच्या निकालानंतर शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन फॉर्म उपलब्ध होणार असून, त्याआधारे १५ जून ते १५ जुलै या कालावधीत पाच फेऱ्यांमध्ये ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना एका अर्जाद्वारे दहा महाविद्यालयांत पसंतीक्रम नोंदविता येईल, तसेच पहिल्या फेरीनंतर शाखा बदलण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. नाशिक महापालिका देवळाली कटक मंडळाच्या (कॅन्टाेन्मेंट बाेर्ड) हद्दीतील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान संयुक्त शाखा या विद्याशाखांच्या २१ हजारांवर जागा आहेत. विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका ऑनलाइन नोंदणीसाठी १५० रुपये शुल्क भरावे लागेल. 
 
अशी होईल प्रवेशप्रक्रिया 
अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान एमसीव्हीसी या चार शाखांसाठी विद्यार्थ्यांना एक अर्ज भरता येईल. ऑनलाइन अर्ज करताना दहावीचा आसन क्रमांक टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती तत्काळ उपलब्ध होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना फक्त आवडीची शाखा, महाविद्यालयांची पसंतीक्रमाने निवड करावी लागणार आहे. त्याआधारे चार गुणवत्ता याद्या तयार केल्या जाणार असून प्रत्येक यादीनंतर विद्यार्थ्यांना मोबाइलवर एमएसएमद्वारे प्रवेशाची माहिती कळेल. एका फेरीनंतर महाविद्यालय शाखा बदलण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना असेल. 
 
सीबीएसई, अायसीएसईसाठी व्यवस्था 
प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांना खासगी क्लासेस अथवा सायबर कॅफेतून अर्ज भरता येणार नाही. आपल्या शाळेतूनच अाॅनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. शहराबाहेरील अथवा आयसीएसई, सीबीएसई आदी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना विभागीय मार्गदर्शन केंद्रातून अर्ज करता येईल. यात गंगापूररोड विभागात व्ही. एन. नाईक कॉलेज, मविप्रचे सीएमसीएस महाविद्यालय, कॉलेजरोड विभागात बीवायके महाविद्यालय, भोंसला मिलिटरी स्कूल, एसएमआरके महिला महाविद्यालय, पंचवटी विभागात पंचवटी महाविद्यालय, ए. पी. पटेल हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, सिडकोतील वावरे महाविद्यालय, इंदिरानगर येथील सुखदेव कनिष्ठ महाविद्यालय तर नाशिकरोडमधील बिटको महाविद्यालय, एस. व्ही. के. टी. महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्रे असतील. 
 
शिक्षण विभागातर्फे उद्या कार्यशाळा 
शहरातील मुख्याध्यापक झोन समिती प्रमुखांना अकरावी अाॅनलाइन प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे शुक्रवारी (दि. २६) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी ११ वाजता मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव मार्गदर्शन करणार असून, मुख्याध्यापकांना माहितीपुस्तिका वितरित करण्यात येणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...