आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण पथक येताच मुलांनी केला पोबारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वेळ - दुपारी 2 वाजेची.. स्थळ - शहरातील रेड लाइट समजली जाणारी वस्ती. शासनाची गाडी येताच वस्तीत एकच गोंधळ उडतो. पोलिस आले की काय, या भीतीने मुलांनी वस्तीबाहेर पोबारा केला. तब्बल तीन ते चार तास शोध घेऊनही हाती फारसे काहीच लागले नाही. अखेर चार ते पाच वर्षांची जी दोन-तीन मुले सापडली. त्यांना नवीन कपडे, चॉकलेट, पुस्तकांची आशा दाखवून समजूत काढत नोंदणी करण्यात आली. पथक येताच मुलांचा पोबारा.. असे काहीसे चित्र पालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेत दिसून आले.
शिक्षणापासून वंचित, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शनिवारी (दि. ४) शोधमोहीम राबविली. अल्पशिक्षितांची वस्ती समजल्या जाणाऱ्या झोपडपट्टी, भंगार बाजार, बसस्थानक, वेश्या व्यवसाय वस्ती आदी ठिकाणी स्वत: पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे, केंद्र प्रमुख पुष्पलता चौधरी, वाॅर्ड समन्वयक पंढरीनाथ भांगरे, मोबीन अन्सारी यांच्या पथकाने जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला.
गंजमाळ भागाजवळील रेड लाइट वस्ती, भद्रकाली परिसरातील वस्तीवर जाऊन ते १४ वयोगटातील मुलांचा शोध घेताना पथकातील अधिकारी दिसताच मुलांनी वस्तीतून धूम ठोकली, तर वस्तीतील महिलांशी समजूत काढत असताना अनेकांनी विरोध केला. मात्र, दिशा फाउंडेशनच्या लता कापसे आशा शेख यांच्या सहकार्याने महिलांची समजूत काढल्यानंतर त्यांनी सहकार्य केले.

गंजमाळ परिसरातील शोधमोहिमेत रेड लाइट वस्तीत प्रशासन अधिकारी उमेश डोंगरे तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुलांची चौकशी केली.
निवासी वसतिगृह शाळेत टाकणार
रेडलाइट भागातील सर्वेक्षणात सागर कोकाटे, आदित्य सामंत, विकास पवार, अक्षय बारे या शाळाबाह्य मुलांची नोंद करण्यात आली असून, त्यांना पुढील शिक्षणासाठी शाळेत पाठविले जाईल. तसेच ज्यांना या भागात राहून शिक्षण घेताना अडचणी येतील त्यांना निवासी वसतिगृह शाळेत प्रवेश मिळवून दिला जाईल.
मीही शाळेत जाणार...
- शाळा शिकण्याची माझी इच्छा असून, मी बोर्डिंगमध्ये जाऊन माझे शिक्षण पूर्ण करेन. या ठिकाणी राहून मला शिक्षण घेता येणार नाही. त्यामुळे मी निवासी शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करेन.
अक्षय बारे, विद्यार्थी
पुन्हा मोहीम राबविणार
- रेड लाइट परिसरात शिक्षणापासून अनेक मुले वंचित आहेत. तसेच काही मुलीही शिक्षणाच्या प्रवाहात नाही. अशा भागांत पुन्हा नोंदणी केली जाईल. महिलांचे मानसिक परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, शिक्षणमंडळ