आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घंटागाडी: महत्त्वाच्या अटींना केराची टाेपली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाधीच काेटीच्या काेटी उड्डाणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या १७६ काेटी रुपयांच्या घंटागाडी याेजनेत ठेकेदारासाठी जाचक ठरणाऱ्या नाशिककरांचा फायदा करणाऱ्या अटींना हळूहळू केराची टाेपली दाखवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे वृत्त अाहे.
ठेकेदारासाेबत करारनामा करताना मुख्य मुद्रांक प्रतिज्ञापत्रावरून महत्त्वाच्या अटी गायब करण्याच्या हालचाली असून, उद्या काेणी अाक्षेप घेतला तर साेयीने अटीशर्थीची नाेंद असलेल्या कागदाचे टाचण जाेडून ठेवण्याची दक्षताही घेतली गेली अाहे. मात्र, हेच करारनामे स्थायी समितीकडे दाेन सदस्यांच्या स्वाक्षरीसाठी गेल्यावर त्यांनी मात्र तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत करारनामे परत पाठवल्यामुळे गाेंधळ उडाला अाहे. अाता अाराेग्य विभाग यावर काय भूमिका घेताे याकडे लक्ष अाहे.

महापालिकेत अलीकडे ठेकेदारांचे चांगभले करण्याकडेच अधिकाधिक कल असल्याचे अनेक घटनांतून उघड झाले अाहे. खासकरून, घंटागाडी याेजनेचा विषय याच मुद्यावरून चर्चेत हाेता. जे काम कचरा संकलन प्रतिटन दराचा हिशेब करता पाच वर्षांसाठी साधारण १३० ते १४० काेटींना देणे अपेक्षित हाेते, तेच काम १७६ काेटींना दिले गेल्यामुळे बरेच अाराेप-प्रत्याराेप झाले हाेते. दरम्यान, त्यातून स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी कचऱ्याच्या हिशेेबानुसार पैसे देण्याची जबाबदारी अायुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर टाकली कृष्णा यांनी ठेकेदाराला गैरप्रकारासाठी संधी मिळणार नाही, अशी व्यवस्था खत प्रकल्पावर कार्यान्वित करण्याचे अादेश दिले. अाता ठेकेदाराला अडचणीच्या अटीशर्थींना वगळण्याच्या अाराेग्य विभागाकडून हालचाली सुरू झाल्याचे वृत्त अाहे. ठेकेदाराला काम देताना अाराेग्याधिकाऱ्यांशी करारनामा बंधनकारक असताे. हा करारनामा ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करताना त्यात अटीशर्थींचा उल्लेख महत्त्वाचा अाहे. दुर्दैवाने अाराेग्य विभागाने ५०० रुपयांच्या मुद्रांकात अटीशर्थीचा काेणताही उल्लेख करता केवळ लेझर कागदावर अटीशर्थी नमूद करून टाचण ठेवण्याची हुशारी दाखवली अाहे. मुद्रांकापासून सहजरित्या वेगळे केल्यास या अटीशर्थी करारनाम्यात अंतर्भूत नव्हत्या, असा दावा करण्याची संधी यातून ठेकेदारांना मिळू शकेल, अशी भीती स्थायी समिती सदस्यांना वाटत अाहे. करारनामा करताना स्थायी समितीच्या दाेन सदस्यांच्या स्वाक्षऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असून, अाराेग्य विभागाने याच सह्यांसाठी स्थायीकडे दाेन दिवसांपूर्वी हा अर्धवट करारनामा पाठवल्याचे सांगितले जाते; मात्र सदस्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत करारनाम्यावर स्वाक्षरीस नकार दिल्यामुळे अाराेग्य विभागाची गाळण उडाली अाहे. त्यातून अाराेग्य विभाग अाता मुख्य मुद्रांकावर अटीशर्थी अंतर्भूत करून घेताे की नाही, हे बघणे महत्त्वाचे अाहे.
पाच वर्षांसारख्या दीर्घकाळासाठी ठेका असल्यामुळे वास्तविक मुद्रांकावरच सर्व अटीशर्थी नमूद करून नाेटरी करणे कायदेशीररित्या त्याची नाेंदणी करून घेणे गरजेचे हाेते. प्रत्यक्षात, केवळ पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर स्वाक्षऱ्या करून घेण्यातच महापालिकेने धन्यता का मानली, असाही सवाल हाेत अाहे. स्थायी समिती सदस्यांच्या तर लेझर पेपरवर सह्या घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्यांनी प्रस्ताव धुडकावून लावल्याचे सांगितले जाते.

करारनामा प्रक्रिया अद्याप अपूर्ण
^घंटागाडीच्या करारनाम्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. स्थायी समितीने करारनामा परत पाठवला अाहे. करारनाम्याच्या अटीशर्थी कायदेशीरित्या नमूद करून घेतल्या जाणार अाहेत. डाॅ.विजय डेकाटे, अाराेग्यधिकारी

वैध कागदपत्रांवरच अटीशर्थी हाेती नमूद
^अाराेग्याधिकाऱ्यांच्या स्तरावर करारनामा हाेत असल्यामुळे याबाबत माहिती घेताे. मात्र, काेणत्याही परिस्थितीत कायदेशीररित्या वैध ठरणाऱ्या कागदपत्रांवरच अटीशर्थी नमूद करून घेतल्या जातील. अभिषेक कृष्णा, अायुक्त
बातम्या आणखी आहेत...