आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणीच्या सक्तीने ग्राहक ‘गॅस’वर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दरवर्षी घरगुती गॅस कनेक्शनची तपासणी करणे बंधनकारक असल्याचे सांगत काही गॅस एजन्सींकडून ग्राहकांकडून चक्क दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत पैसे अाकारले जात असल्याचे दिसून अाले अाहे. गेल्या वर्षापर्यंत या तपासणीची फी ७५ रुपये होती, मात्र यंदापासून अचानक दीडशे रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे. गॅस कंपन्यांतर्फे दर दोन वर्षांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गॅस कनेक्शनची तपासणी केली जाते. त्यासाठी शासनमान्य फी ७५ रुपये आकारण्यात येते. सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी आवश्यक असली तरी शासनाकडून त्याची सक्ती नाही. परंतु, शहरातील काही गॅस एजन्सींकडून या तपासणीसाठी सक्ती केली जात आहे. तसेच, ही शासनाचीच स्कीम असून, तपासणी सक्तीचीच आहे. गॅस तपासणी केली नाही तर पुढील सिलिंडर मिळणार नाही, अशी भीती घालून प्रत्येक ग्राहकाकडून या तपासणीच्या नावाखाली सर्रास १५० रुपये उकळण्याचा प्रकार शहरात सुरू असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे येत आहेत. मुख्य म्हणजे, गॅस उपकरणांची कुठल्याही प्रकारे तपासणी करता कागदावर टीकमार्क करून पैसे घेतले जात असल्याच्याही तक्रारी येत असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अाहे.
गांधीनगर भागात दीडशे रुपये शुल्क..
शहरातील उपनगर, गांधीनगर भागात गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडून सध्या तपासणीच्या नावाखाली सक्तीची वसुली सुरू असल्याच्या तक्रारी वाढत अाहेत. या भागातील गॅस एजन्सीकडून दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात असल्याचे तक्रारकर्त्यांनी सांगितले. याबाबत काही ग्राहकांनी गॅस एजन्सीकडे तक्रार केली असता गॅसची तपासणी सक्तीची असून, ती करावीच लागणार असल्याचे सांगण्यात आले. तर, फीबाबतही काेणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांच्याकडून ग्राहकांना सांगण्यात आले.

एसएमएसद्वारे दिली जात आहे माहिती
‘लवकरच आमचा मेकॅनिक अापल्याकडे तपासणीसाठी येईल, त्याला सहकार्य करून रुपये १५० रुपये देऊन त्याबाबतची पावती घ्यावी,’ असे संदेश भारत गॅस कंपनीच्या वतीने ग्राहकांना मोबाइलवर पाठविले जात आहेत. ज्या लोकांना या संदर्भात एसएमएस आला आहे, त्यांच्या घरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भेटही दिली जात आहे. मात्र, या तपासणीचे तब्बल १५० रुपये ग्राहकांकडून घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या अाहेत.

तपासणीची सक्ती नाहीच
दर दोन वर्षांनी भारत गॅसतर्फे ग्राहकांना हवे असल्यास गॅस कनेक्शनविषयक ग्राहक जनप्रबोधन करण्यात येत असते. या प्रबोधनासाठी शुल्क म्हणून ७५ रुपये अाकारले जात असल्याची माहिती मिळाली आहे. गॅस कनेक्शन तपासणी करायची आहे की नाही, याचा अधिकार ग्राहकांनाच असून, त्यासाठी सक्ती करणे पूर्णत: चुकीचे असल्याचेही अधिकृत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले अाहे.

नि:शुल्क असावी तपासणी
गॅस कनेक्शन विकल्यानंतर ग्राहकांच्या सुरक्षेसाठी तपासणी वारंवार आणि नि:शुल्क करून देण्याची गॅस एजन्सीची जबाबदारी आहे. मात्र, शासनाकडून असे कोणतेही बंधन नसल्याचे गॅस एजन्सीकडून सांगितले जात आहे. कुठलीही तपासणी करता एजन्सी ग्राहकांकडून प्रत्येक कनेक्शनमागे १५० रुपये आकारत आहे. या तपासणीची चौकशी पुरवठा विभागाने करण्याची गरज असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

अशी केली जातेय गॅस सिलिंडरची तपासणी...
घरी गॅस सिलिंडर पुरविणारा व्यक्तीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत उघडकीस आले आहे. तपासणीसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची नेमणूक करणे गरजेचे असताना, गॅस सिलिंडर पुरविणारा व्यक्तीच ही सर्व तपासणी करत आहे. या डिलिव्हरी बॉयला मेकॅनिकल म्हणून तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोबत असलेल्या एका कागदावर ‘हो किंवा नाही’मध्ये माहिती भरावयाच्या कागदावर तो स्वत:च टिक करतो. अर्धा एक मिनिटात त्याची दारातूनच तपासणी पूर्ण होते. कागदावरील पूर्ण रकाने भरल्यानंतर ग्राहकाच्या हाती कागद सोपवून रकमेची मागणी केली जाते. तपासणीबाबत विचारणा केल्यानंतर ‘अहो साहेब तपासणी झाली आहे, तुम्हाला माहीत का आम्हाला?’ असे माेहघम उत्तर देऊन सर्रास लूट सुरू अाहे.

तपासणीचे घेतले तब्बल १५० रुपये
^शासनाचे आदेश असून, गॅस तपासणी करावीच लागणार असल्याचे सांगून गांधीनगर भागातील गॅस एजन्सीकडून केवळ फाॅर्म भरण्याचे १५० रुपये घेण्यात आले. याबाबत भारत गॅस कंपनीकडे तक्रारही केली आहे. ७५ रुपयांचे दीडशे रुपये कसे काय घेतले, हेही अजून समजले नाही. हा प्रकार चुकीचाच अाहे. -व्ही. आहिरे, ग्राहक

‘उपकरण चेकिंग चार्ज’च्या नावाखाली लूट
‘उपकरणचेकिंग चार्ज’च्या नावाखाली ग्राहकांची सर्रास लूट सुरू असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. केवळ गॅस सिलिंडरला पाहून, रेग्युलेटर वर-खाली करून तपासणी पूर्ण झाल्याचे सांगत ग्राहकांडून पैसे घेतले जातात. एजन्सीकडून होणारी ही तपासणी खराेखरच सुरक्षेसाठी आहे की रक्कम उकळण्यासाठी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शुल्क बंधनकारकच; मात्र जादा वसुली चुकीचीच
दरदोन वर्षांनी गॅस तपासणी करणे गरजेचे असून, तपासणीसाठी ७५ रुपये देणे बंधनकारक आहे. तसे आदेश शासनाकडून गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना आहेत. त्यानुसार गॅस एजन्सी ७५ रुपये आकारत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नाव छापण्याची अटीवर दिली. तर, दीडशे रुपये घेणे चुकीचेच असल्याची कबुलीही त्यांनी दिली अाहे.

ग्राहकांनाे,तक्रारींसाठी येथे साधा संपर्क..
गॅस संदर्भात केवळ मोठ्या तक्रारी असतील किंवा वितरक गैरव्यवहार करीत असेल तरच जिल्हा पुरवठा अधिकारी त्यात लक्ष घालतात. त्यामुळे वितरकाबाबत तक्रार किंवा नवीन गॅस कनेक्शनबाबत किंवा गॅस वेळेवर मिळत नसल्यासारख्या किरकोळ तक्रारींबाबत एचपी गॅस - (०२४०) २४८४८४६ टोल फ्री नं. -१८००२३३३५५५; बीपी गॅस - (०२५५१) २३०३३६ टोल फ्री नं.- १५५२३३ या क्रमांकावर तक्रार करता येऊ शकते.

शासनाची याेजना असल्याचे सांगत सर्रास लूट...
गॅस कनेक्शनची तपासणी ही शासनाचीच योजना असल्याचे काही गॅस एजन्सींच्या व्यवस्थापकांनी सांगितले. मात्र, या तपासणीत शासनाच्या कोणत्याही कागदपत्रांचा वापर केला जात नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले. तपासणीच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या या व्यक्तींकडे शासनाचा लोगो अथवा सिम्बॉल असलेली कुठलीही कागदपत्रे नाहीत. केवळ भारत गॅस असे लिहिलेल्या कागदावर ग्राहकांकडून विविध प्रश्नांची उत्तरे ‘होय अथवा नाही’ या स्वरूपात भरून घेतली जात आहे. तसेच, ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर गॅस पाहून दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत पैसे मागितले जात आहेत.
सरिता नरके, जिल्हापुरवठा अधिकारी
शहरातील काही गॅस एजन्सींकडून ग्राहकांची गॅस तपासणीच्या नावाखाली लूट केली जात असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे प्राप्त झाल्या आहेत. ‘सुरक्षेसाठी तुमच्या गॅसची तपासणी आवश्यक अाहे. ही शासनाचीच स्कीम असून, तपासणी सक्तीची आहे. गॅस तपासणी केली नाही तर पुढील सिलिंडर मिळणार नाही’, अशी ताकीद देत ग्राहकांकडून १०० ते १५० रुपये उकळण्याचा प्रकार शहरात सुरू असल्याच्या तक्रारी अाहेत. अनेक ठिकाणी तर कुठलीही तपासणी करता केवळ कागदावर नोंद करून ग्राहकांकडून पैसे लाटले जात असल्याचेही सांगण्यात अाले आहे. या धक्कादायक प्रकारावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
गॅस तपासणीच्या नावाखाली १०० ते १५० रुपये उकळण्याचा अजब ‘फंडा’; नकार देणाऱ्या
ग्राहकास पुढील सिलिंडर देण्याच्या धमक्या
{ शासनाकडून गॅस तपासणीची ग्राहकांना सक्ती करण्यात आली आहे का?
-गॅस तपासणीबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. गॅस तपासणी सक्तीही केलेली नाही. ही तपासणी गॅस एजन्सीकडूनच सुरू असावी.
{शहरात काही ठिकाणी गॅस तपासणीच्या नावाखाली तब्बल दीडशे रुपये घेतले जात आहेत, त्याचे काय?
-गॅस एजन्सीकडून ग्राहकांना एसएमएस पाठवून या फीबाबत, तसेच गॅस कनेक्शन तपासणीबाबत माहिती दिली जात आहे. हे शुल्कही कंपनीकडूनच आकारले जात आहे.
{आधी ७५ रुपये फी घेतली जात होती, आता थेट १५० रुपये घेतले जात आहेत. त्याचे काय?
-सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दरवर्षी घरगुती गॅस कनेक्शनची तपासणी करणे गरजेचेच आहे. मात्र, शुल्काच्या रकमेबाबत गॅस कंपनीच सांगू शकते. याबाबत कंपनीकडून आलेले एसएमएस विक्रीकर अधिकाऱ्यांना पाठवले आहेत. त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, ते पाहावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...