आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : गॅस सिलिंडरचा स्फाेट; तीन घरांना भीषण अाग, जीवितहानी टळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाग नियंत्रणात अाणताना अग्निशामक दलाचे जवान. - Divya Marathi
अाग नियंत्रणात अाणताना अग्निशामक दलाचे जवान.
नाशिक - अाडगाव येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने तीन घरांना आग लागली. रविवारी (दि. १६) दुपारी वाजेच्या सुमारास आडगाव येथील देशमुख गल्लीत ही भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली. मात्र, तीन घरांमधील संसाराेपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने सुमारे दीड लाखाची वित्तहानी झाली. अग्निशामक दलाच्या चार बंबांच्या साह्याने दोन तासांनी आगेवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. 
 
अाडगाव येथील देशमुख गल्लीमधील संजय लभडे यांच्या घरात भाडेकरी म्हणून राहात असलेले नंदू काकडे यांच्या यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे या घराला आग लागली. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. तोपर्यंत अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळावर दाखल झाला होता. मात्र, आग अधिक प्रमाणात असल्याने शेजारील महाजन आणि अन्य एक भाडेकरी राहत असलेल्या तीन घरांना या आगीने कवेत घेतले. दगड, माती आणि लाकडाची घरे असल्याने आग झपाट्याने पसरली, तोपर्यंत अग्निशामक दलाचे आणखी दोन बंब दाखल झाले. घरे अरुंद जागेत असल्याने आग नियंत्रणासाठी जवानांना कसरत करावी लागत होती. लाकडी जुने घर असल्याने शेजारील शैलेश महाजन या भाडेकऱ्याच्या घराला आग लागली. मातीच्या भिंतीअसल्याने पाण्याच्या प्रेशरमुळे भिंती पडल्याने तीन घरांचे प्रचंड नुकसान झाले. दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवता आले. के. के. वाघ फायर स्टेशनचे कैलास हिंगमिरे, तौसिफ शेख, उमेश गोडसे, उमेश गिते, संदीप जाधव, गणपत धोत्रे, पंचवटी फायर स्टेशनचे एस. पी. मेंद्रे, यू. आर. झिटे, व्ही. आर. गायकवाड, एस. बी. गाडेकर, एस. डी. घुगे या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सानप यांच्यासह पथकाने घटनास्थळावर परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
 
उष्म्यामुळेआग लागल्याची शक्यता : घरातीलगॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बंद केल्याने गॅस उष्म्यामध्ये मिसळून आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाने व्यक्त केली आहे. तसेच घरात सायकलचे टायर-ट्यूब आणि अन्य साहित्य असल्याने आग लागली असावी. तीन घरांच्या भिंती लागून असल्याने तीनही घरे आगीच्या ज्वालांमध्ये सापडली.
 
अशी घ्या काळजी 
उन्हाळ्यामध्ये गॅस गळती होण्याची शक्यता अधिक असते. नागरीकांनी गॅस िसलिंडरचे रेग्युलेटर बंद करावे. वर्षातून एकदा गँस सिलेंडरची नळी बदलावी. बाहेर जाताना घरातील विजेचे सर्व दिवे बंद करावेत. देवघरातील उदबत्ती, तसेच दिवा लावत असल्यास तो बंद करावा. सुरक्षिततेसाठी गॅस सिलिंडर मोकळ्या जागेत ठेवावे. वापर झाल्यास गॅस बंद झाला का नाही याची खात्री करावी. गॅसजवळ ज्वलनशील वस्तू ठेवू नये. या किरकोळ बाबींची काळजी घेतल्यास गॅस गळतीने आग लागण्याच्या घटना रोखू शकतात, अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
 
घरी नसल्याने वाचले मजूर 
देशमुखगल्ली मध्ये लभडे, देशमुख यांच्या घरामध्ये भाडेकरी राहतात. मोलमजुरीसाठी हे कुटुंब बाहेर असल्याने घरांना कुलूप होते. स्फोट झाला त्यावेळी या घरातील सर्व सदस्य बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. या सर्व कुटुंबीयांचे नशीब बलवत्तर असल्याने सर्वजण वाचले. मात्र, या कुटुंबांचे संसाराेपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाल्याने या कुटुंबीयांवर बेघर होण्याची दुर्दैवी वेळ आल्याने आडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 
नागरिकांकडून मदत 
आगीमध्ये सर्वस्व गमावलेल्या या कुटुंबीयांना आधार राहिला नसल्याने परिसरातील नागरिकांकडून कपडे, धान्य आणि इतर वस्तूंची मदत केली जाणार आहे. आडगावकरांनी या कुटुंबीयांना मदतीचा हात दाखवल्याने कुटुंबीयांनी मनोमन अाभार व्यक्त करत अश्रूंना वाट मोकळी करून देत गावकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...