आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदाघाटावरील हॅलाेजनवर चाेरट्यांची नजर, काेट्यवधींचे विद्युत साहित्य वाऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापुरामुळे गोदाघाट परिसराची पूर्णत: वाताहत झाली असून, महापुरानंतर तीन दिवस उलटूनही महापालिकेला गाेदाघाट परिसरात अस्तव्यस्त पडलेल्या विद्युत साहित्याकडे लक्ष देण्यास मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येते. परिणामी, या परिसरात पुराच्या तडाख्याने काेलमडलेल्या काेट्यवधींच्या विद्युत खांबांवर तसेच दिवे, हॅलाेजनवर चाेरट्यांनी डाव साधण्यास सुरुवात केल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. विशेष म्हणजे, याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात अाली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप हे घाट वर्गीकृत करण्यात अाले नसल्याचे सांगण्यात अाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कर्मचाऱ्यांनीदेखील या प्रश्नी हात वर केल्याने प्रशासनाची उदासीनवृत्ती पुन्हा एकदा अधाेरेखित झाली. सिंहस्थ पर्वाचा समाराेप अाला असतानाही घाटांच्या वर्गीकरणाचे घाेंगडे भिजत असल्याने काेट्यवधी रुपयांचा केवळ चुराडा करण्यातच प्रशासनाला धन्यता वाटते का, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
सिंहस्थकुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे नाशिक जिल्हा, महापालिका, तसेच पाेलिस प्रशासनाचे सर्वस्तरातून कौतुक झाले. मात्र, प्रत्यक्षात कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वण्या पार पडताच प्रशासनाकडून विविध कामे, तसेच विविध गाेष्टींच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत अाहे. सिंहस्थात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरात प्रशस्त घाट साकारण्यात आले. मात्र, अाजघडीला या घाटांची ठिकठिकाणी दुरवस्था झाल्याचे, तसेच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत अाहे. ही समस्या असतानाच मंगळवारी अालेल्या महापुरामुळे या घाटांची अधिकच दयनीय अवस्था झाली अाहे. विशेष म्हणजे, या पुरात गाेदाघाटावरील विद्युत साहित्याचे प्रचंड माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, त्याहून विशेष म्हणजे पुराचे पाणी अाेसल्यानंतर तीन दिवसांनीही संबंधित प्रशासनाने या ठिकाणी साधी पाहणी करणेदेखील गरजेचे समजले नाही. याचमुळे परिसरातील या काेट्यवधींच्या साहित्यावर चाेरट्यांनी डाव साधला असून, अनेक महागडे हॅलाेजन विद्युत पाेलही गायब झाल्याचे ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत दिसून अाले अाहे.

साधारणत: पाच हजार रुपयांपासून पुढे किंमत असलेल्या या तीनशेहून अधिक हॅलाेजनची सुरक्षितता धाेक्यात अाली असून, महागडे खांब, ताराही सर्रास उघड्यावर पडलेल्या असल्याचे ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत समाेर अाले.

माहिती घ्यावी लागेल
काही दिवसांपूर्वीच माझी या विभागात बदली झाली आहे. गोदाघाटावरील विद्युत साहित्याच्या संदर्भातील या प्रकाराबाबत तसेच महपालिकेकडे घाट हस्तांतर करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती घ्यावी लागेल. मला अाताच सांगता येणार नाही. -एन. व्ही. शेलार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

खांबावर चढून हॅलोजन चाेरण्याचे प्रकार...
सिंहस्थात घाटाच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी प्रकाश व्यवस्था सक्षम होण्यासाठी या ठिकाणी उंच विद्युत खांब लावून त्यावर हॅलोजन बसविण्यात आले होते. मात्र, पुरामुळे हे विद्युत खांब वाकल्याने काही टवाळखोरांकडून थेट खांबावर चढून महागडे हॅलोजन चोरण्याचे प्रकार घडत आहेत. पुराचे पाणी ओसरले तरी प्रशासनाने अद्यापही या विद्युत साहित्याच्या दुरुस्ती वा देखभालीकडे लक्ष देण्याची भूमिका घेतली नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.

..तर कारवाई करणार
घाट परिसरात कोणीही शासकीय मालमत्तेचे नुकसान करत असेल वा चोरी करत असेल तर कडक कारवाई करू. या भागात नियमित गस्त घालण्यात येते. -सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे

सिंहस्थ समाराेप नजीक, तरी घाट वर्गीकृतच नाही
ऑगस्ट२०१५ मध्ये सुरू झालेल्या कुंभपर्वाचा येत्या ११ ऑगस्टला समाराेप हाेत अाहे. मात्र, एक वर्ष उलटूनही घाटांच्या वर्गीकरणाचा मुद्दा कायम असल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडते. घाटांच्या वर्गीकरणाची कारवाई सुरू करण्यात येऊन जलसंपदा विभागाला पत्र पाठविण्यात अाले हाेते. मात्र अद्यापपर्यंत जलसंपदाकडून महापालिकेला पत्र पाठविण्यात अाले नसावे ही प्रक्रिया पूर्ण झाली नसावी, अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

विविध विभागांकडून नुसती टाेलवाटाेलवीच...
शहरातझालेल्या जोरदार वृष्टीमुळे गोदाघाटाचे किती नुकसान झाले, साहित्याच्या नुकसानीबाबत अाढावा घेतला का, याबाबत महापालिका प्रशासनाच्या विद्युत विभागाला विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट वर्गीकृतच झाल्याचे सांगण्यात अाले. सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यांना विचारले असता, त्यांनी नवीनच नियुक्ती झाल्याने माहिती नसल्याचे सांगत हात वर केले. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनीदेखील माहिती देण्यास टाळाटाळच केली.

- ३२० एकूण विद्युत दिवे (हॅलाेजन)
- ४ विद्युत दिवे (हॅलाेजन) एका खांबावर
- ८० विद्युत खांब
- १ किलाेमीटर साधारणत: घाटाची लांबी

थेट प्रश्न
एस. पी. बनकर, कार्यकारीअभियंता, मनपा विद्युत विभाग

गोदाघाट परिसरातील विद्युत खांब तथा हॅलाेजन दिव्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले अाहे. चाेरट्यांनी हे साहित्य लंपासही केल्याचे दिसून येते. हे प्रकार थांबवण्यासाठी अद्याप कारवाई का हाेताना दिसून येत नाही?

-याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना करून तातडीने पाहणी करताे. असे प्रकार हाेत असल्यास तत्काळ माहिती घेतो.

गोदाघाट परिसरातील या विद्युत साहित्याच्या देखभालीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग हात वर करीत असल्याचे दिसून येते. मग कारवाईची नेमकी जबाबदारी कोणाची?

-सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अद्याप महापालिका प्रशासनाकडे घाट वर्गीकृ़त करण्यात आल्याने देखभालीबाबत अडचणी येतात. लवकरच या प्रकाराबाबत याेग्य निर्णय घेण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...