आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडतमुक्तीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा, व्यापाऱ्यांचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य शासनाने शेतकऱ्यांना आडतमुक्त केल्याने याविरोधात राज्यातील २९९ बाजार समित्यांतील आडतदार आणि व्यापाऱ्यांनी शनिवार (९ जुलै) पासून बेमुदत लिलाव बंदची हाक दिली आहे. कांदा, डाळिंब आणि भाजीपाला पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये बंद असल्याने देशभरात या गाेष्टींचा पुरवठा होणार नाही हे स्पष्ट अाहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अधिक दराने भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे.

लिलाव बंदचा बिगुल सर्वात प्रथम नाशिकमध्ये वाजल्याने जिल्ह्यातून मुंबई, बडोदा, सुरत, अहमदाबाद आणि नाशिकमध्ये जाणारा भाजीपाला, फळभाज्या आणि फळे पुरवठा ठप्प होणार अाहे. परिणामी शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहणार असून ग्राहकांना वंचित राहावे लागणार आहे. प्रशासनाने शेतकरी गटांच्या माध्यमातून ग्राहकांना भाजीपाला पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र पावसाच्या ओढीमुळे भाजीपाला कमी असल्याने तसेच पणन, सहकार आणि कृषी विभागाने शेतकरी गटांना सहकार्य केले नसल्याने शेतकऱ्यांचे गटही एकत्रित राहिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विल्हेवाट आणि ग्राहकांना भाजीपाला पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समितीच्या सभापतींसोबत चर्चा करून भाजीपाला पुरवठा करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले अाहेत.

बंद महाराष्ट्रात, फटका संपूर्ण देशाला
गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता, दिल्ली, पंजाब, नेपाळ या ठिकाणी महाराष्ट्रातून सर्वाधिक भाजीपाला, फळांचा पुरवठा केला जातो. आडतदार आणि व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला असल्याने भाजीपाला आणि फळभाज्यांवर परिणाम होणार आहे. हा बंद लांबला तर भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे, संगमनेर, वाशी येथील बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळभाज्या आणि फळे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र आडतदार आणि व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकल्याने देशात पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

समन्वयाचा फटका
राज्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतीमाल बाजारात थेट विक्री करता यावा यासाठी शेतकरी गट तयार केले होते. सुरुवातीला शेतकरी गटांनी भाजीपाला विक्री करण्यास सुरुवात केली. मात्र शहरामध्ये किरकोळ विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना दमदाटी केली गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला. तसेच या संदर्भात पणन, सहकार आणि कृषी विभाग यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्याचे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कांदा करणार वांधा
देशामध्ये बंगलोर, आग्रा, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, इंदूर, कळवण, कोलकाता, लासलगाव, मुंबई, पुणे आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो. शुक्रवारी (८ जुलै) देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये १ लाख ६४ हजार २४७ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. त्यापैकी फक्त महाराष्ट्रातून ६० हजार ३९८ क्विंटल कांदा विक्री झाला होता. या बंदमुळे अन्य राज्यांना होणारा भाज्या आणि फळांचा पुरवठा थांबणार असल्याचे निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना कृषी विभागात वर्ग करावे
शासनाच्या निर्णयामुळे बाजार समितीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे शासनाने बाजार समितीमधील राज्यातील ७ हजार कर्मचाऱ्यांना कृषी विभागात वर्ग करावे.
नीलेश दिंडे, नाशिक विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र बाजार समिती कर्मचारी संघटना

कायमच संपावर जावे
शासनाने आडतमुक्तीचा चांगला निर्णय घेतला आहे. पहिल्याच दिवशी शेतीमालाला चांगले वजन आणि चांगले दर मिळाले. तसेच शेतकऱ्यांच्या कुबड्या काढून घेतल्याने खऱ्या अर्थाने त्यांना माहिती होणार आहे. संपाच्या पहिल्या दिवसापासून शेतीमालाला दर मिळाल्याने आडतदार आणि व्यापाऱ्यांनी कायमचे संपावर जावे -
डाॅ. गिरिधर पाटील, कृषी अभ्यासक

व्यापाऱ्यांवर आडतीचा बोजा
सरकारच्या वतीने सांगण्यात आल्यानुसार शिवार खरेदी करणे व्यापाऱ्यांना परवडणारे नसल्याने त्यांचा खर्च वाढणार आहे. परिणामी ग्राहकांना शेतीमाल अधिक दराने खरेदी करावा लागेल. शासनाने व्यापाऱ्यांवर आडतीच्या टाकलेल्या बोजाची भरपाई होऊ शकणार नाही.
संदीप पाटील, व्यापारी, नाशिक.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...