आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता गावागावांत होणार खास महिला ग्रामसभा, विकासासाठी थेट सहभागाची महिलांना संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चौदाव्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना मिळणार असल्याने शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘आमचा गाव, आमचा विकास’ अभियानाअंतर्गत राज्यभर महिलांच्या खास ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या महिला सभांमध्ये गावातील महिलांनी मांडलेले प्रश्न आणि सुचवलेली कामे यांचा समावेश प्रत्येक गावाच्या पंचवार्षिक आराखड्यात करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिला असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. त्यामुळे १५ हजार कोटींच्या नियोजनात थेट सामील होण्याची संधी गावागावांतील महिलांना मिळणार आहे. गावाच्या विकासाचा आराखडा ठरवत असताना त्यातील १० टक्के निधी महिला बालविकास कार्यक्रमांसाठी ठेवण्याची सूचना असल्याने महिला सभांमधील सूचना आणि मागण्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.

आतापर्यंत ग्रामपंचायतींच्या अनुदानापैकी ७० टक्के थेट ग्रामपंचायतींना मिळत होते आणि ३० टक्के अनुदानाचा विनियोग शासन स्तरावर केला जात होता. मात्र, १४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावाने त्यांचे प्रश्न त्यांचे प्राधान्यक्रम यानुसार त्यांच्या गावाचा पंचवार्षिक आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट शासनातर्फे देण्यात आले होते. त्यासाठी ‘आमचा गाव, आमचा विकास’ हे खास अभियानही राबवण्यात आले. त्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी या ग्रामसभा आणि हे नियोजन फक्त कागदोपत्री झाले, काही ठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले नाही आदी मुद्द्यांमुळे तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या छाननीत ते बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या गावांचे विकास आराखडे पुन्हा करावे लागणार आहेत.

स्वागतार्ह पाऊल
खरेतर गावाला नियोजनाचा अधिकार देणारा केंद्राचा हा निर्णय योग्य होता, परंतु राज्य सरकारच्या अनास्थेमुळे त्याची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. अशा वेळी महिला सभांच्या माध्यमातून गावविकास नियोजनात महिलांना सहभागी होण्याची संधी मिळत असेल तर ते अत्यंत स्वागतार्ह आहे. गावाचा विकास आराखडा ठरवण्यात सहभागी होण्याची महत्त्वाची संधी यामुळे महिलांना मिळेल. - भीमरासकर, समन्वयक,महिला राजसत्ता आंदोलन
बातम्या आणखी आहेत...