आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरकणी कक्षाचा वापर सुरक्षारक्षकांच्या आरामासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिला बाळांचे आरोग्य लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी बाळाच्या स्तनपानाची सुरक्षित साेय व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने उपाययोजना केल्या गेल्या. याचसाठी राज्यातील शासकीय कार्यालय, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी सर्व सोयीसुविधा असलेला हिरकणी कक्ष स्थापन करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. या धोरणांतर्गत परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील २५० बसस्थानकांत कक्षाची स्थापना करण्यात आली हाेती. एसटीची वाट बघत तासन‌्तास ताटकळत बसणाऱ्या महिलांना या सुविधेमुळेच बसस्थानकावर बाळाला स्तनपान करण्यासाठी हक्कांची जागा झाली हाेती. मोठा गाजावाजा करत सुरू केलेला हा उपक्रम मात्र नव्याचे नऊ दिवसच या उक्तीप्रमाणेच झाला. बसस्थानकांतील हे हिरकणी कक्ष कुठे आहेत हे शोधण्यातच बराच वेळ जात असल्याच्या तक्रारी महिलांकडून हाेत अाहेत. विशेष म्हणजे शहरातील प्रमुख बसस्थानक असलेल्या ठक्कर बाजार परिसरातील हिरकणी कक्षांचा उपयोग या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांच्या सोयीसाठी केला जात असल्याची बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली आहे. शहरातील सर्व बसस्थानकांत अशीच परिस्थिती असून इतर स्थानकांतीलही सुविधा ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच झाली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या वतीने प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपक्रम, योजना राबविले जात असताना दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे त्यांना टाळे लागते अाहे. या प्रकारामुळे प्रवाशांची होणारी कंुचबणा लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहेे. 
 
{बसस्थानकांवर शिशूंच्या सुरक्षित स्तनपानासाठी हिरकणी कक्ष. 
{या कक्षाचा उपयाेग हाेताे इतर कारणांसाठीच. 
{अनेक अधिकाऱ्यांना या कक्षाची माहितीच नाही. 

हिरकणी कक्षाचा नियमित वापर होताे 
^बसस्थानकातमहिलांनीहिरकणी कक्षांची विचारणा केल्यास सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या कक्षाचा नियमित वापर केला जातो. -एन. एच. जाधव, आगारप्रमुख, ठक्कर बाजार बसस्थानक यामिनी जाेशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ 
 
हिरकणी कक्षाएेवजी हिरकणी बसचीच माहिती 
जुने सीबीएस परिसरातून ग्रामीण भागात एसटी बसेस सोडण्यात येतात. यामुळे या बसस्थानकातही मोठ्या संख्येने प्रवासी येत असतात. या ठिकाणी हिरकणी कक्ष आहेत का याबाबत विचारणा केल्यास येथील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हिरकणी कक्षा-ऐवजी हिरकणी बसेसची माहिती दिली जाते. यामुळे हिरकणी कक्षाबाबत एसटी महामंडळ किती सजग आहे याची प्रचिती येते. 

राज्यातील प्रत्येक बसस्थानकात असा हवा हिरकणी कक्ष 
राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ बाय १० आकाराचे कक्ष उभारण्यात यावे. या कक्षात केवळ बालकांसमवेत अालेल्या मातांनाच प्रवेश दिला जावा. या कक्षाबाबत माहिती व्हावी यासाठी कक्षाच्या बाहेर बालकांची सुंदर मोठी छायाचित्रे लावण्यात यावी. त्याबरोबरच या कक्षात बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास, अडचण निर्माण होणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचना महामंडळाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. 

आगारप्रमुखाचा कक्ष म्हणजेच हिरकणी कक्ष 
मेळा बसस्थानकात तर या हिरकणी कक्षाबाबत प्रचंड उदासीनता असल्याचे दिसून आहे. या ठिकाणी हिरकणी कक्षाबाबत चौकशी केली असता, थेट आगारप्रमुखांचा कक्ष दाखविण्यात आला. या ठिकाणी एखादी महिला आल्यास या आगारप्रमुखांच्या कक्षाचा वापर केला जात असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली. 

सुरक्षारक्षकांकडून हाेतो हिरकणी कक्षांचा असाही वापर 
ठक्करबाजार बसस्थानकात रोज मोठ्या संख्येने प्रवासी येत असतात. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली. मात्र सद्यस्थितीत या कक्षाचा ताबा सुरक्षारक्षकांनी घेतला असून, या कक्षाचा ताबा आराम करण्यासाठी, साहित्य ठेवण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फलक वा हिरकणी कक्षाबाबत माहिती होईल अशा सूचना लावण्यात आल्याने हा हिरकणी कक्ष कागदापुरताच मर्यादित राहिला आहे. विशेष म्हणजे सुरक्षारक्षकांकडून आरामासाठी या कक्षाचा वापर केल्याचे सांगत एसटीच्या अधिकाऱ्यांकडून कुलूपबंद ठेवण्यात येते. 
 
बातम्या आणखी आहेत...