नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात डायलिसिसच्या रुग्णांची मोठ्या संख्येने वाढ हाेत असल्याने या रुग्णांची गैरसाेय टाळण्यासाठी आणखी दहा डायलिसिस यंत्रांच्या मागणीचा प्रस्ताव आमदार देवयानी फरांदे यांनी दिला होता. मात्र, या प्रस्तावाला राज्य शासनाकडून एप्रिल महिन्यात मंजुरी मिळूनदेखील एक वर्षानंतरही रुग्णालयाची मागणी दुर्लक्षितच अाहे. परिणामी, डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांचीही गैरसाेय कायम अाहे.
दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले असून, माेठ्या संख्येने गरजू रुग्ण या ठिकाणी दाखल हाेत अाहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या अाहेत. मुख्य म्हणजे, या संदर्भ सेवा रुग्णालयात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्ण डायलिसिससाठी येत असल्याने येथील डायलिसिस विभागात असलेली अाठही मशिन्स कमी पडत आहेत. या अाठ मशिन्सपैकी दोन एचआयव्ही एचबीएसएसी रुग्णांसाठी राखीव आहे. परंतु, डायलिसिससाठीची प्रतीक्षा यादी दर दिवशी २० ते २५ अशी अाहे. त्यामुळे संदर्भ सेवा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये रुग्णांचे डायलिसिस केले जात आहे. परंतु, यात यंत्रणेवर प्रचंड तणाव पडताे.
डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण बघता रुग्णालयात आणखी दहा डायलिसिस यंत्र डायलिसिस चेअर्सची गरज भासत अाहे. ही डायलिसिस यंत्रणा तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी गेल्या वर्षी आरोग्य अर्थ मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. यानंतर आरोग्य अर्थमंत्र्यांकडून या यंत्रणेसाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मंजुरीही मिळवली. मात्र, त्याला वर्ष उलटूनही अद्याप रुग्णालयात डायलिसिस यंत्र डायलिसिस चेअर उपलब्ध झालेली नसल्याने रुग्णाचे कर्मचाऱ्यांचीही प्रचंड गैरसाेय कायम आहे.