आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाईसाठी पथक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  महामार्गावरील हॉटेलमध्ये मद्यविक्री बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच मद्यपींकडून हरताळ फासला जात अाहे. या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता अशाप्रकारे अनधिकृत मद्यविक्री करणाऱ्या हॉटेलचालकांवर कारवाईसाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले असून या पथकाकडून धडक कारवाई केली जाणार आहे. पोलिल उपआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ मध्ये स्वतंत्र पथक कार्यन्वित करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २९) रात्री आठ वाजेपासून पथकाकडून धडक कारवाई सुरु करण्यात अाली अाहे. 
 
महामार्ग आणि राज्यमार्गापासून ५०० मीटरवरील मद्याची दुकाने बंद झाल्याने मद्यपींकडून पार्सल घेऊन महामार्गावरील हॉटेल, धाब्यांवर मद्यपींची मैफल रंगत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत अाहे. या गंभीर प्रकरणावर ‘डी. बी. स्टार’ने प्रकाशझोत टाकला होता. या वृत्ताची दखल घेत पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी कारवाईसाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकाकडून मद्यपींसह हॉटेलमालकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. परिमंडळ मध्ये स्वतंत्र पथक कार्यान्वित राहणार आहे. हे पथक महामार्ग, आणि राज्य मार्ग तसेच शहरातील रस्त्यांवरील हॉटेलमध्ये अचानक कारवाई करणार आहे. 

गंगापूररोडवरील बहुतांशी हॉटेलमध्ये सर्रास मद्यविक्री केली जात आहे. हॉटेलमध्ये मद्याच्या किमतीपेक्षा अधिक दर आकरले जाऊन मद्य विक्री केले जाते. तसेच मद्य प्राशन करण्यासाठी स्वतंत्र चार्ज घेतला जात असल्याने हॉटेलमालकांकडून ग्राहकांची लूटमार सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने नूतनीकरण केलेल्या हॉटेल, बार, परमिट रूममध्येही सर्रास मद्य विक्री केले जात आहे. 

रस्त्यांवर बैठक : हॉटेल,बार बंद झाल्याने मद्य खरेदी करुन रस्त्यावर वाहनात मद्याच्या पार्टी केल्या जात आहे. महामार्गावरील उड्डाणपुलाखाली निर्जन ठिकाणी वाहनात पार्टी झडत असल्याने याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गंगापूर, आडगाव, म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यांवर मद्यपींच्या पार्ट्या झडत आहेत. 

धडक कारवाई सुरू करणार 
^महामार्गावरील हॉटेल,ढाबे आणि लहान-मोठ्या हॉटेलमध्ये मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. हॉटेलमालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. पथक महामार्गावरील सर्व हॉटेल आणि ढाब्यांवर कारवाई करणार आहे. रात्री आठ वाजता कारवाई सुरू झाली आहे. -लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त 
‘डी. बी. स्टार’मध्ये शनिवारी प्रसिद्ध झालेले वृत्त 
 
बातम्या आणखी आहेत...