आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय ‘दुखणे’ दूर, मनसे आमदाराच्या ना‘राजी’वर पडदा!, वसंत गिते राज भेटीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसेचे नाराज आमदार वसंत गिते यांनी पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या दौर्‍याकडे पाठ फिरवल्यानंतर रविवारपासूनच नाशिकमधील राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. सोमवारीही आमदार समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे गितेंचे ‘कमल’ हे निवासस्थान गर्दीने फुलून गेले होते. दरम्यान, मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी निवासस्थानी येऊन समजूत काढल्यानंतर आमदार गिते यांनी राज ठाकरेंची भेट घेतली व त्यानंतर ना‘राजी’ नाट्यावर पडदा पडला.

मनसेतील गेल्या काही दिवसापासूनच घडामोडीमुळे अस्वस्थ असलेल्या आमदार गिते यांनी रविवारी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी दांडी मारली. दुसरीकडे गिते यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केले. लगोलगच त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतही चर्चा सुरू झाली. एकुणच प्रकरणामुळे मनसेतील नाराजी नाट्य रंगात आले असताना दुसर्‍या अंकात नेमके काय होणार याची उत्सुकता होती.

सोमवारी सकाळपासूनच गिते यांच्या निवासस्थानी पदाधिकार्‍यांची गर्दी होत होती. त्यातून गिते समर्थक नगरसेवकही फोन करून आपल्या सहकार्‍यांना बोलवत होते. महापौर अ‍ॅड यतीन वाघ यांनीही गिते यांची भेट घेवून विचारपूस केली. नगरसेवकांना विचारल्यानंतर ते समर्थन वा पाठींबा वगैरे उद्देश नसून केवळ दुखापतीमुळे ’भाऊं’ची भेट घेण्यासाठी आलोे असे स्पष्टीकरण देत होते. अशातच राज यांचा दौरा सुरू झाल्यावर मात्र नगरसेवक त्यास सहभागी झाले. दौरा संपल्यानंतर मात्र, पुन्हा काही नगरसेवकांनी गिते यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. दरम्यान समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे परिसर फुलून गेला होता.

राज-गिते यांच्यात गुफ्तगू
विश्रामगृहावर राज ठाकरे यांच्या दालनात केवळ गिते हे एकटेच गेले. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, येथे नाराजीविषयी राज यांनी कोणताही शब्द काढला नाही. गिते यांना दुखर्‍या नसेबाबत विचारणा केली. कोठे उपचार घेतोय असे विचारत मुंबईतील डॉ लाड यांच्याकडे उपचार करू असे सांगितले. त्यानंतर राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले.

असा झाला समेट
आमदार गिते यांची नाराजी दूर करण्यासाठी मनसे आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर व दीपक पायगुडे हे नाशकात आले. त्यांनी गितेंची भेट घेऊन नाराजीचे कारण विचारले. सूत्रांच्या माहितीनुसार, गिते यांनी महिनाभरापासून पक्षात आपल्याविरोधात सुरू असलेल्या कुरापतीबाबत नाराजी व्यक्त केली. मनपाच्या कारभारात गैरप्रकार केल्याची चुकीची माहिती साहेबांपर्यंत पोहोचवली गेली. नगरसेवक विरोधात असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना गिते यांनी आपण इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्टीकरणही दिले. ते ऐकून घेतल्यानंतर या तिघांनी गितेंची समजूत काढली व त्यानंतर ते राज ठाकरेंना भेटण्यास तयार झाले.

नाशिकचा नाद सोडणार
विधानसभेसाठी दादर किंवा नाशिकमधून राज ठाकरे हे लढतील, अशी अटकळ होती. खुद्द राज यांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केल्यामुळे तसेच त्यांचे दौरेही वाढल्यामुळे त्यास पुष्टी मिळत होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी भडकल्यामुळे राज आता नाशिकचा नाद सोडतात की काय, असे चित्र आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर पक्षात नाराजी नको म्हणूनही राज यांनी एक पाऊल मागे घेत समेटासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जाते.