आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्या तासाच्या अंतरात दोन सोनसाखळ्या लांबवल्या, 11 तोळे सोने लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेले दोन सोनसाखळी चोर. - Divya Marathi
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेले दोन सोनसाखळी चोर.
जळगाव - चोरी,घरफोडीच्या घटना थांबत नाहीत तोवरच रविवारी शहरात अर्ध्या तासाच्या अंतरात सोनसाखळीचोरीच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनांत वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवण्यात आल्या असून, यात एकूण सव्वातीन लाख रुपयांचे सोने लंपास झाले आहे. गुजराती गल्ली येथील रेखाबेन कोठारी वर्षा कॉलनी येथील नलिनी भोळे यांच्या गळ्यातून सोनसाखळी चोरली आहे. 
 
शहरात चोरी, घरफोडीचे सत्र सुरू असताना शुक्रवारी रविवारी अशा एका दिवसाच्या गॅपनंतर सोनसाखळीचाेरीच्या दोन घटना घडल्या. रविवारी सकाळी ७.३० वाजता चाेरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या. दोन्ही घटना अर्ध्या तासाच्या अंतरात घडलेल्या असल्यामुळे चोरटे एकच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात एमआयडीसी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
‘ओपनथिएटर कहाँ है?’ विचारत ओढली सोन्याची पाेत 
दुचाकीवरूनआलेल्या या दोन चोरट्यांनी गुजराती गल्ली येथे राहणाऱ्या ७६वर्षीय आजीबाई रेखाबेन चंद्रकांत कोठारी यांना टार्गेट केले. कोठारी यांच्या घरापासून काही अंतरावर दुचाकी उभी केली. दुचाकीस्वार भामटा हेल्मेट घालून बसून राहिला, तर मागे बसलेला चोरटा रस्ता ओलांडून पायी चालत रेखाबेन यांच्याकडे आला. ‘ओपन थिएटर कहाँ है?’ असा प्रश्न त्याने रेखाबेन यांना केला. त्यानंतर रेखाबेन यांनी हाताने इशारा करून त्याला पत्ता सांगितला. मात्र, रेखाबेन यांची नजर चुकवून त्याने त्यांच्या गळ्यातील लाख ४० हजार रुपयांची तोळे वजनाची सोनसाखळी तोडून पळ काढला. दुचाकी सुरू करून उभ्या असलेल्या भामट्याने काही सेकंदातच दुचाकी वळवली. दोघे बालगंधर्व नाट्यगृहाच्या दिशेने पळून गेले. रेखाबेन यांनी अारडाओरड करून कुटंुबीयांना सांगितले. याबाबत जिल्हापेठ पोलिसांनी पाळधी येथील एका युवकावर संशय घेत त्याची कसून तपासणी केली; परंतु तो सोनसाखळीचोर नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. रेखाबेनदेखील धार्मिक कार्यक्रमाला जाण्यासाठी सकाळी लगबगीत होत्या. याचा फायदा घेत चोरट्यांनी सोनसाखळी लांबवली. 
 
घराजवळ फेरफटका मारताना उडवली चेन 
सकाळी 7 वाजता याच भामट्यांनी रचना कॉलनी परिसरातील वर्षा कॉलनी येथे राहणाऱ्या नलिनी प्रल्हाद भोळे यांच्या गळ्यातील तोळ्यांची सोनसाखळी लांबवली. नलिनी भाेळे ( ७२) ह्या घराजवळ फेरफटका मारत होत्या. याच वेळी दोन भामट्यांनी दुचाकीवरून येऊन त्यांना पत्ता विचारला. भाेळे यांचे लक्ष विचलित होताच मागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पोबारा केला. भोळे यांची सोनसाखळी ९० हजारांची होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
 
दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले 
दोन्ही घटनांमध्ये संशयित भामट्यांचे सीसीटीव्ही फुटेज वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले आहे. एमआयडीसी जिल्हापेठ पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून, त्या आधारावर संशयितांचा शोध सुरू केला आहे. मात्र, दोन्ही ठिकाणचे फुटेज जास्त स्पष्ट नसल्यामुळे तपासात थोडी अडचण येते आहे. तथापि, घटनांतील पीडित महिला परिसरातील नागरिकांशी बोलून पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी घडलेल्या घटनेची पद्धतही सारखीच असल्यामुळे सोनसाखळीचोरांचा शहरात मुक्काम वाढलेला असल्याचे स्पष्ट होते आहे. कोर्ट चौकात सलग दोन दिवस चोरी चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना रविवारी या ‘डबल चेन स्नॅचिंग’ने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता चंद्रमा अपार्टमेंट येथून ६०वर्षीय निवृत्त शिक्षिका विजया नारायण कदम यांच्या गळ्यातील सोनसाखळीही पत्ता विचारण्याच्याच बहाण्याने लांबवली होती. ते चोरटेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...