आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात हजार भाविक नेपाळमध्येच अडकले, मानसरोवर यात्रा अपूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बारा वर्षांनंतर येणारा आषाढी पौर्णिमेचा मुहूर्त साधण्यासाठी कैलास मानसरोवर यात्रेला निघालेल्या सात हजार भाविकांना ऐनवेळी चीन सरकारने व्हिसा नाकारल्याने ते नेपाळमध्येच अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील सुमारे 2 हजार भाविकांचा समावेश आहे. नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीला मात्र परवानगी मिळाल्याने त्यांच्या 43 भाविकांनी कैलास मानसरोवराकडे प्रयाण केले.

मे ते ऑगस्टदरम्यान कैलास मानसरोवर येथे यात्रा भरते. त्यासाठी देशभरातून सुमारे 20 ते 22 हजार भाविक जातात. यंदा आषाढी पौर्णिमेचा मुहूर्त तब्बल बारा वर्षांनतर आला असून चीनमधील ‘दांचेन’ व ‘चिऊगोंपा’ या विशिष्ट ठिकाणी स्नान करणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या यात्रेकरूंसोबत तिबेटी नागरिकही घुसखोरी करतील या भीतीने चीन सरकारने मे महिन्यात काही मोजक्याच कंपन्यांना व भारत सरकारच्या यात्रेस व्हिसा व परवाना मंजूर केला. इतर कंपन्यांना ऐनवेळी यात्रा रद्द करावी लागली. पुन्हा जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यानंतर यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने महाराष्ट्र व गुजरातमधील अनेक टूर्स कंपन्यांमार्फत हजारोंच्या संख्येने भाविक मानसरोवराकडे रवाना झाले.

भाविकांनी दक्षता घ्यावी
चीनकडून व्हिसा, परवाना मिळाला की नाही, याची खात्री करूनच भाविकांनी यात्रा कंपन्यांकडे पैसे भरावे. अन्यथा त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. चौधरी यात्रा कंपनीसह देशभरातील फक्त पाच कंपन्यांनी निर्धारित वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केल्याने आमच्या भाविकांना 1 जुलैला व्हिसा-परवाना मिळाला, अशी माहिती चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली.

सुरक्षिततेचे कारण
यात्रेचा मार्ग भारतातून नेपाळ-काठमांडू मार्गे आहे. यात्रेपूर्वीच दिल्लीतून चीन दूतावासाकडून व्हिसा व परवानगी प्राप्त करून घ्यावी लागते. मात्र, यंदा जादा गर्दी व सुरक्षेचे कारण देत चीन सरकारने व्हिसा नाकारल्याने हजारो भाविक नेपाळमध्येच अडकले. काही भाविकांनी केंद्रीय मंत्र्यांकडे धाव घेतली आहे. पौर्णिमेला सहा दिवस बाकी असून काही तरी तोडगा निघू शकतो, या आशेने भाविक थांबले आहेत.