आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालिदास नूतनीकरण : सूचना स्वीकारण्याचे वरातीमागून घोडे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महत्प्रयासाने महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. प्लॅनही तयार झाला, पाडापाडीही झाली. पण, रंगकर्मींना काय हवे आहे ते सुचवण्याचे घोडे मात्र आत्ताशी नाचवले गेले. मुळातच, सूचनांच्या या घोड्यांची धाव महापालिकेचे अधिकारी मनावर घेणार का, हा खरा प्रश्न आहे. 

नगरसेवक शाहू खैरे आणि नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने शहरातील रंगकर्मींना नाट्यगृहाच्या नूतनीकरणाची माहिती द्यावी तसेच त्यांच्याकडून सूचना मिळाव्या, यासाठी नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये पीपीटी प्रेझेंटेशन दाखवण्यात आले. हे प्रेझेंटेशन दाखवताना खुर्च्या, स्टेज, साऊंड, लाइट कर्टन इत्यादी इत्यादी सगळीच माहिती देण्यात येत होती. पण, प्रत्यक्षात नाट्यगृहात अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमांद्वारे काम करणाऱ्या रंगकर्मींना अनेक प्रश्न पडले होते. नऊ कोटी रुपये खर्च करून जर नाट्यगृहाचे नूतनीकरण होणार असेल तर नाट्यगृह नवीनच दिसायला हवे. अशा अपेक्षेने रंगकर्मी एक एक प्रश्न विचारत होते. समोर नाट्यगृहाचे काम देण्यात आलेले आर्किटेक्ट, कन्सल्टंट, साऊंड इंजिनिअर, बॉसचे रिजनल मॅनेजर एसी कन्सल्टंट यांच्यासह महापालिकेचे अधिकारीही बसून जमेल तशी उत्तरे देत होते. जमेल तसं लिहूनही घेत होते. एकवेळ अशी आली की कोण कोणाला प्रश्न विचारत आहे, हेच मुळात समजत नव्हते. मग कोणाचा आवाज वाढला तर कोणी शांत बसले. अखेरीस मग ‘उशीर झाला, आपण आपल्या सूचना लेखी देऊ’ असे सांगत हा प्रेझेंटेशनचा कार्यक्रम गुंडाळण्यात आला. 
 

यांनी दिली उत्तरे
आर्किटेक्टधीरज पाटील, नाट्यगृह कन्सल्टंट निखिल पिंगळे, साऊंड इंजिनिअर राजेश पाटील, बॉसचे रिजनल मॅनेजर तेजस देसाई, राजेंद्र बोरसे, अनिल पाटील, दिलीप भामरे, तर महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे यू. बी. पवार, अधीक्षक अभियंता जी. एम. पवार, कार्यकारी अभियंता एन. आर. वंजारी, उपअभियंता व्ही. डी. माडीवाले, सहाय्यक अभियंता एस. एस. अदेसर. 

यांनी घेतला सहभाग 
नाट्यपरिषदेचे पदाधिकारी प्रा. रवींद्र कदम, शाहू खैरे, सुनील ढगे, जयप्रकाश जातेगावकर, सदानंद जोशी, सुनील देशपांडे, विनोद राठोड, राम नवले, राजेश जाधव, पराग जोशी, ईश्वर जगताप, रवि जन्नावार, शाम लोंढे, आनंद ओक, माणिक कानडे, अरुण गिते, प्रवीण कांबळे, धनंजय धुमाळ, विद्या देशपांडे, महेश डोकफोडे यांच्यासह शहरातील अनेक रंगकर्मी 
 
‘लेखी सूचना दिल्या तरच उपयाेग’ 
‘आपणअशी एकमेकांना प्रश्नोत्तरे करत बसलो तर हे काम कधीच होणार नाही. शिवाय, आपल्याला काय उपलब्धी हवी आहे तेदेखील कळणार नाही. केवळ तोंडी नव्हे तर आपल्या सूचना लेखी द्याव्या. त्यावर नाव, नंबर लिहावा. त्यासाठी सूचनापेटीत ते टाकावे’, असा संवाद शाहू खैरे आणि नाट्य परिषदेचे शाखा अध्यक्ष रवींद्र कदम यांनी साधल्यावर जरा शांतता झाली. 

आमच्या हातात काहीच नाही! 
‘मुळातच आम्ही अधिकारी नाही. आम्ही फक्त एका वास्तूचे काम घेतले आहे. नाट्यगृहाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच येथे काम करण्यात येईल. आता त्यातही आज ज्या काही सूचना आल्या आहेत, ती जबाबदारी आता अधिकाऱ्यांची आहे. कोणतेही शासकीय काम नव्याने करायचे असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. त्याला वेळ लागताे. जर ते महापालिकेतून अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होऊन आमच्यापर्यंत आले तर ते आम्हाला करावेच लागते. तोपर्यंत आमच्या हातात काहीच नाही. आमचे काम हे फक्त कॉस्मेटिक करायचे आहे’, अशी माहिती ‘कालिदास’संदर्भात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली. 

सूचनांचा उपयोग होणार का? 
तांत्रिकदृष्ट्या या सूचना अमलात आणणे किती शक्य आहे, हा विचार केला पाहिजे. कोणतेही शासकीय काम, प्रस्ताव, ठराव, टेंडर अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असल्याशिवाय होत नाही. मुळातच, ‘कालिदास’च्या नूतनीकरणाचे काम विविध संस्थांना देण्यात आले आहे. आता त्यांना जर या सूचनांचा विचार करायचा असेल तर पुन्हा महापालिकेतून कागदी घोडे नाचवण्याची एक प्रक्रिया असते. एखाद्या कामी ती पूर्ण झाली तर ते काम होऊ शकते. अन्यथा, बुधवारी झालेल्या सोहळ्याला ‘एक नाट्य असेही’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

या विषयांवर झाली चर्चा
खुर्ची,पीठ, कर्टन, अॅकॉस्टिक, लाइट, लाइटचे पाइप, त्याचे वजन, फ्लॅश, सोलर, कलाकारांच्या जेवणाची व्यवस्था, रंगमंच, विंगा, गाडी येण्यासाठी जागा यासह इतर तांत्रिक बाबी. 

औपचारिक भूमिपूजन
कालिदासकलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम तब्बल ३५ वर्षांनंतर हाती घेण्यात आले. जुलैपासून नाट्यगृह बंद ठेवण्यात आले. थेट पाडापाडीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे नाट्य परिषदेच्या वतीने विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून औपचारिक भूमिपूजन करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...