आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामशास्त्राला बीभत्सता येऊ न देता सामान्यांना मार्गदर्शन, ‘वात्स्यायनाचे जग या पुस्तकाचे प्रकाशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मने जुळल्यानंतर केल्या जाणाऱ्या कामक्रीडेतूनच मी अाणि तु ही एकत्वाची भावना क्षणभरापुरती जागृत हाेते. अशा ब्रह्मसहाेदर अानंदाची किंचितशी का असेना झलक देणाऱ्या या साैंदर्यवान क्रीडेचे सूक्ष्म वर्णन वात्स्यायनाने केले अाहे. १७ शतकांपूर्वी त्याने सांगितलेल्या कामशास्त्राला कुठेही बीभत्सता येऊ देता सामान्यांना कळेल अशा भाषेत मांडण्याचे काम ‘वात्स्यायनाचे जग’ या पुस्तकाने केले असल्याचे प्रतिपादन दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांनी केले. ‘दिव्य मराठी’ च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या वैद्य विजय कुलकर्णी यांच्या लेखांच्या संकलनातून तयार झालेल्या या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात अभिनेते डाॅ. गिरीश अाेक यांच्या हस्ते करण्यात अाले. 
 
शंकराचार्य न्यासच्या कुर्तकाेटी सभागृहात ‘वात्स्यायनाचे जग’ या पुस्तकाचा प्रकाशन साेहळा रंगला. यावेळी व्यासपीठावर अभिनेते डाॅ. गिरीश अाेक, दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रशांत दीक्षित, डाॅ. अभय सुखात्मे, लेखक वैद्य विजय कुलकर्णी, डाॅ. शरदचंद्र वडाेदकर अाणि प्राचार्य डाॅ. राम कुलकर्णी अादी मान्यवर उपस्थित हाेते. 

यावेळी बाेलताना दीक्षित यांनी वैद्य कुलकर्णींच्या लेखमालेपासूनच या विषयाने माझ्यासह लाखाे वाचकांचे लक्ष वेधून घेतल्याचे नमूद केले. लेखमालेतून वाचकांना चांगले अाणि अनाेख्या विषयावरील मजकूर वाचायला दिल्याचा अानंद या पुस्तक प्रकाशनाने द्विगुणीत झाल्याचेही त्यांनी सांगितले. एकेकाळी कामप्रेरणेला माेकळेपणाने सामाेरा जाणारा हा समाज हाेता, असेच वात्स्यायनाच्या पुस्तकातून अापल्याला दिसून येते. कामक्रीडेकडे निराेगी, निकाेप दृष्टीने पाहणारा सुसंस्कृत, सुसंपन्न समाज या देशात हाेता. मात्र, त्यात कुठेही स्वैराचार नव्हता. या साैंदर्यवान क्रीडेतील अानंद वाढवण्याच्या विविध छटा वात्स्यायन हा ऋषी त्या काळात समाजाला सांगत हाेता. अाणि तितकाच प्रगल्भ असलेला समाज तेवढ्याच सहजतेने ते एेकून, समजून घेत हाेता. असेही दीक्षित यांनी नमूद केले. 
 
वडिलांच्या शब्दाखातर पुस्तक : वैद्य विजय कुलकर्णी यांनी वडील डाॅ. म. बा. कुलकर्णी यांना दिलेल्या शब्दाखातर अाणि दिव्य मराठीने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे पुस्तक अाकाराला अाल्याचे सांगितले. वात्स्यायनाने कामशास्त्राबराेबरच अन्य अनेक शास्त्रांचा सखाेल अभ्यास केला असल्याचे त्यांचे पुस्तक वाचल्यावर उलगडते. लैंगिक शिक्षणाच्या प्रचार अाणि प्रसारासाठी वात्स्यायनाच्या या पुस्तकाचा उपयाेग व्हावा अाणि पाेर्नाेग्राफीच्या विळख्यातून युवा पिढी बाहेर येण्यात मदत झाल्यास पुस्तकाचे श्रम सार्थकी लागतील, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी डाॅ. अभय सुखात्मे अाणि डाॅ. शरदचंद्र वडाेदकर यांनीही मनाेगत व्यक्त केले. स्वागत गीत साेनाली कुलकर्णी वर्मा यांनी सादर केले. प्रास्ताविक सागर कुलकर्णी यांनी केले. अध्यक्षांचा परिचय दिव्य मराठीचे डेप्युटी एडीटर अभिजीत कुलकर्णी यांनी तर पाहुण्यांचा परिचय डाॅ. राम कुलकर्णी, अनीता कुलकर्णी अाणि यतीन मुजुमदार यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुप्रिया फणसळकर यांनी तर अभार डाॅ. एकनाथ कुलकर्णी यांनी मानले. 
 
प्राण्यात विकृती का नाही ? 
भय अाणि लज्जादेखील साेडून देण्याची भावना ज्यातून निर्माण हाेते ती लैंगिक भावनादेखील मानवात तितकीच प्रबळ असते, असे डाॅ. गिरीश अाेक यांनी सांगितले. मात्र, लैंगिक ज्ञानाचा अभाव हा पूर्वी अाणि अाजही कायम अाहे. उलट पूर्वीच्या तुलनेत नकाे तशा स्वरुपातून माहिती मिळणे सहजशक्य झाल्याने नकाे तेच घडत अाहे. कालाैघात प्राण्यांमध्ये काेणतीही विकृती अालेली नाही, पण ती माणसात का अाली? तर स्मृती अाणि धृतींचे इनपुट घेणेच मेंदुने बंद केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
 
सुत्र रुपाने मांडणारी संस्कृती 
कामप्रेरणेकडे इतक्या माेकळेपणाने पाहणारा समाज अाणि संस्कृतीत कामक्रीडेबाबत इतका ‘टॅबू’ कसा निर्माण झाला हादेखील एक प्रश्नच अाहे. मात्र, कामप्रेरणेतून परिपूर्ण अानंद मिळाल्यास संबंधित धर्माच्या ठेकेदारांची समाजावरील सत्ता कमी हाेण्याची भीती असल्याने या प्रेरणेलाच दडपून टाकण्याचे काम संपूर्ण जगभरात नंतरच्या काळात झाले.
 
भारतीय संस्कृतीत काेणतेही ज्ञान हे सुत्ररुपाने मांडण्याची परंपरा अाहे. त्या सुत्ररुपी मागील ज्ञानाचा अाणि विद्यमान सुत्रांचा संबंधित भाष्यकाराने त्या - त्या काळाचे भान राखत कालानुरुप भाष्य करणे अपेक्षित असते. तशाच प्रकारचे भान राखत वैद्य कुलकर्णी यांनी भाष्य केले असल्याचेही दीक्षित यांनी सांगितले. 
 
वैद्य विजय कुलकर्णी यांच्या ‘वात्स्यायनाचे जग’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रशांत दीक्षित, डाॅ. गिरीश अाेक, डाॅ. अभय सुखात्मे. समवेत वैद्य विजय कुलकर्णी, प्राचार्य डाॅ. राम कुलकर्णी अादी. 
 
बातम्या आणखी आहेत...