आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : मुक्त विद्यापीठाच्या ‘किऑस्क’ खरेदीतही 50 लाखांचा घोटाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - विद्यार्थ्यांना इच्छित माहिती मिळवताना प्रचंड पसारा असलेल्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये फिरायला लागू नये, म्हणून विद्यापीठात किऑस्क यंत्रणा खरेदी करण्यात आली. मात्र, केवळ ९ यंत्रणा खरेदीची मंजुरी असतांना तब्बल ७० किऑस्क मशीनवर ५० लाखाहून अधिक रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, एक-दोनच किऑस्क मशीन सध्या सुरू असून उर्वरित सर्व मशिन्स विद्यापीठातच ठिकठिकाणी धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संकेतस्थळापासून तर परीक्षा विभागात झालेला घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता विद्यापीठात यंत्रणा खरेदीवर झालेल्या लाखोंचे घोटाळेही समोर येण्यास सुरुवात झाली आहे.  विद्यापीठाला भेट देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना इच्छित माहिती मिळवताना प्रचंड पसारा असलेल्या कॅम्पसमध्ये फिरायला लागू नये, म्हणून विद्यापीठाच्या वतीने गेल्या २ वर्षांपूर्वी किऑस्क यंत्रणा लावण्याचे ठरविण्यात आले. या किऑस्क यंत्रणा खरेदी करण्यासंदर्भात तत्कालीन कुलगुरूंची परवानगीही घेण्यात आली. मात्र, कुलगुरूंकडून केवळ ९ किऑस्क यंत्रणा खरेदी करण्याची परवानगी असताना चक्क ७० किऑस्क खरेदी करण्यात आली. तसेच  खरेदी करण्यात आल्यापासून आतापर्यंत या यंत्रणेचा वापरच झाला नसल्याचे उघड झाले आहे. तसेच या यंत्रणांपैकी केवळ दोन ते तीनच यंत्रणा सध्या सुरू असून उर्वरित यंत्रणा विद्यापीठात ठिकठिकाणी पडून आहे. त्यासाठी  खर्चलेले ५० लाख रुपये पाण्यात गेले आहेत.
 
किऑस्कचा वापरच नाही
मुक्त विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये किऑस्क बसवले जाणार होते. त्यावर विद्यापीठाशी संबंधित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार होते. यात सर्व महत्त्वाच्या सूचना, परिपत्रके, प्रवेश, पात्रता, स्थलांतर याबाबत माहिती, परीक्षांचे वेळापत्रक, निकाल, विशेष लेक्चर्स, सेमिनार, कार्यशाळा, कॅम्पस मॅप आदींसह विद्यापीठाच्या वेबसाइटवरील सर्व माहिती या किऑस्कवर देण्यात येणार होती. मात्र, या यंत्रणेचा वापरच करण्यात आला नाही.   
 
चौकशी करणार
- विद्यापीठात किऑस्क यंत्रणा बघितल्यानंतर या यंत्रणा खरेदीचे काय कारण, त्याचा वापर का झाला नाही याची संपूर्ण माहिती मागवली आहे. किती किऑस्कची मंजुरी मिळाली होती आणि खरेदी किती झाली याची  चौकशी करू.  
ई.वायुनंदन, कुलगुरू, मुक्त विद्यापीठ .
बातम्या आणखी आहेत...