आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी मोजणाऱ्या तंत्रज्ञानामुळे कुंभमेळ्याचे योग्य नियोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मक्का येथे सैतानाला दगड मारण्याच्या धार्मिक सोहळ्यात शेकडाे मुस्लिम भाविक गुरुवारी (दि. २४) मृत्युमुखी पडले. त्याचप्रमाणे भारतातही दरवर्षी होणाऱ्या धार्मिक सोहळ्यांमध्ये चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनांची मालिका नेहमी घडतच असते. नाशकात झालेल्या कुंभमेळ्यात एकेका पर्वणीला ४० लाख भाविकांची गर्दी होऊनही तिन्ही पर्वण्या सुरळीत पार पडल्या.
फूट-मॅट्सवरून असा बांधला अंदाज
ही मॅट कुंभथॉनच्याच विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यातील पर्वण्यांना गोदावरीनजीक पाच ठिकाणी फूट-मॅट लावण्यात आली होती. स्नान करून परतणाऱ्या भाविकांच्या परतीच्या मार्गावर या मॅट लावण्यात आल्या होत्या. त्यावर पाय देऊन बाहेर जाणाऱ्या भाविकांची गणती करण्यात आली होती. या मॅट सर्वच मार्गांवर बसवण्यात आल्या असत्या, तर अधिक अचूक अंदाज लावता आला असता. मात्र, वेळेअभावी तसेच काही अन्य तांत्रिक कारणांमुळे ते शक्य झाले नसले, तरी भविष्यात अन्यत्र या तंत्रज्ञानाचा वापर भाविकांच्या जीवरक्षणासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो.
भविष्यात हे तंत्रज्ञान निम्म्या किमतीतही
या तंत्रज्ञानासाठी जे इलेक्ट्रॉनिक स्टेशननामक उपकरण तयार करण्यात आले आहे. त्याची किंमत सध्या १५ हजार आहे, तर १ फूट बाय २ फूट आकाराच्या फूट-मॅटमागे १ हजार रुपये खर्च लागताे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर त्याची निर्मिती केली असली तरी भविष्यात मोठ्या प्रमाणात हे तंत्रज्ञान वापरले गेल्यास त्याची किंमत निम्मी होऊ शकते. त्यामुळे एकीकडे धार्मिक सोहळ्यांवर लाखो आणि कोट्यवधी रुपये खर्च उधळून होणाऱ्या सोहळ्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केल्यास गर्दीबाबतची इत्थंभूत माहिती जमा होऊन भविष्यातील दुर्घटनांना पायबंद घालणे शक्य होणार आहे.
अशा प्रकारे केली जाते पारंपरिक मोजणी
एका चौरसमीटर अंतरावर साधारणपणे तीन भाविक याप्रमाणे एकूण चाैरसमीटर गुणिले तीन प्रतितास या प्रकारे भाविक संख्या मोजली जाते. आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे तज्ज्ञ राजीव चौबे यांनी जागतिक मानांकनानुसार पारंपरिक पद्धतीने नाशिकमधील भाविकांची संख्या मोजली होती. ती दुसऱ्या पर्वणीला सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत २८ लाखांचा अंदाज यात वर्तवण्यात आला होता.
चेंगराचेंगरीची ही आहेत प्रमुख कारणे
गर्दीचा अचूक अंदाज नसणे, गर्दी कोणत्या वेळेत कुठे झाली आहे, त्याची तत्क्षणी न मिळणारी माहिती, जाण्यायेण्यासाठीचा एकच अरुंद रस्ता, पर्वतावरील धार्मिक स्थळे किंवा मंदिरापर्यंत जाण्यासाठी चिंचोळी वाट, अनियंत्रित गर्दी, भाविकांचा बेशिस्तपणा, हत्तीसह अन्य काही प्राणी उधळणे यासह अपघात होणे किंवा तशा स्वरूपाच्या केवळ अफवेने उडणारा गोंधळ याच प्रमुख कारणांमुळे चेंगराचेंगरी होत असते.
असे आहे फूट-मॅटचे तंत्रज्ञान
नाशिकच्या विराज रानडे, परीक्षित जाधव, हिरेन पंजवाणी या इंजिनिअर्सनी आणि निलय कुलकर्णी या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले ‘फूट-मॅट’ हे उपकरण तयार केल्याने सिंहस्थातल्या गर्दीच्या ठिकाणच्या भाविकांची मोजणी सहज शक्य झाली. या अॅपच्या कर्त्यांनी त्याला ‘अशियोटो’ असे नाव दिलेले आहे. मीडिया व पोलिसांनी मात्र या उपकरणाला फूट-मॅट अथवा स्टेप-ट्रॅकर असे नाव दिले आहे. या उपकरणासाठी डोअरमॅटसारखी रबरी फूट-मॅट आणि या विद्यार्थ्यांनी तयार केलेले इलेक्ट्रॉनिक स्टेशन यांचाच प्रामुख्याने वापर होतो. त्या मॅटवर एखाद्या माणसाने एकच पाय दिला, दोन्ही पाय दिले किंवा दोन्ही पाय अनेक वेळा दिले तरी त्या माणसाची एकदाच नोंद होते, असे त्याचे सर्किट बनवण्यात आले आहे. तसेच मॅटपासून १० मीटर अंतरावर असलेल्या व्यक्तीच्या मोबाइलवरही ब्ल्यू टूथद्वारे दर १० ते २० सेकंदांत आवश्यक डाटा पाहणे या तंत्रज्ञानामुळे शक्य आहे.
मोबाइल कंपन्यांद्वारे अशी झाली मोजणी
डम्ब डाटा अॅनालायझरनुसार विविध मोबाइल सिम कार्ड कंपन्यांशी संपर्क साधून नाशिक कार्यक्षेत्रात त्यांचे वापरकर्ते किती आहेत, हे नाशिकच्या एमायटी कुंभथाॅनने जाणून घेतले. त्यातील पूर्वीच्या ग्राहकांची संख्या वजा करून नवीन किती ग्राहक त्या दिवशी कक्षेत येऊन त्यांनी मोबाइलचा वापर केला, त्याद्वारे हे तंत्र विकसित करण्यात आले आहे. शास्त्राेक्त पद्धतीने मोजण्याची ही दुसरी प्रक्रिया आहे. त्याशिवाय त्या ग्राहकांमध्ये मोबाइल संचाचा वापरच करत नसलेल्यांचे प्रमाण ठरवून गर्दीचा शास्त्रोक्त आकडा एमआयटी कुंभथाॅनने वर्तवला होता.