आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी सिन्नरला लोटला भक्तांचा सागर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातून काढण्यात अालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेले कावडीधारक - Divya Marathi
शहरातून काढण्यात अालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेले कावडीधारक
सिन्नर- मिरवणूक मार्गावर केलेले सडासंमार्जन, अंगणात काढलेल्या रांगोळ्या आणि भैरवनाथाचा रथ पुढ्यात आल्यावर दर्शनासाठी लोटणाऱ्या भाविकांची गर्दी असा माहोल सोमवारी संपूर्ण शहरात दिसत होता. भैरवनाथ यात्रेनिमित्त माहेरवाशिणी आणि बाहेरगावी व्यवसाय-धंद्यानिमित्त स्थायिक झालेल्या सिन्नरकरांची येथे देवदर्शनासाठी गर्दी झाली होती. रथाला बैलजोड्या जोडून मिरवणुकीत सहभागी होण्याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत लगबग सुरू होती. 
 
सिन्नरचे आराध्यदैवत आणि जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. सकाळी वाजता रथ मिरवणूक निघाली. ढोल-ताशे, आणि टाळ-मृदंगाच्या गजरातील या मिरवणुकीने गावातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. शहरातील पाचोरे कुटुंबीयांना रथ मिरवणुकीचा मान असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते भैरवनाथाची सेवा करत आहेत. ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्योदयाबरोबर प्रारंभ झालेली रथाची मिरवणूक सूर्यास्तापर्यंत सुरू होती. 
रथाच्या पुढे चालणारी वारकरी भजनी मंडळाची दिंडी तर पाठीमागे विविध प्रकारचे कलाकुसर करून खांद्यावर गंगेचे पाणी घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेले कावडधारी, तसेच जागोजागी कावडीधारक आणि रथाचे पूजन करण्यासाठी सुवासिनींची सुरू असलेली लगबग असे चित्र मिरवणूक मार्गात दृष्टीस पडत होते. संपूर्ण शहरातून रथाची आणि कावडीची मिरवणूक झाल्यानंतर भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात या मिरवणुकीची सांगता झाली. नायगाव येथील गंगेवरून आणलेल्या पाण्याने कावडीधारकांनी भैरवनाथाला जलाभिषेक घातला. रात्री मंदिराच्या प्रांगणात शोभेची दारू उडवण्यात आली. करमणुकीसाठी आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. 
 
ग्रामीण भागातही यात्रोत्सवाची धूम 
तालुक्यातील सोनांबे, सोनारी, शहा, विंचूर दळवी आदी गावांत कावडी, काठी आणि देवाच्या मुखवट्याची मिरवणूक काढून यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सोनांबे आणि सोनारी येथे देवाला खारा नैवेद्य दाखवण्याची प्रथा असून, इतर गावांत मात्र गोड नैवेद्य वाहून भाविक नवसपूर्ती करतात. मात्र, यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवार असल्याने खारा नैवेद्य वर्ज्य राहिला. आज मंगळवारी या गावांमध्ये बोकड बळी देऊन भाविक नवसपूर्ती करतील. शहा येथे कालभैरवनाथाचे जागृत देवस्थान असून, येथे दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. 
शहरातून काढण्यात अालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेले कावडीधारक भैरवनाथांची मूर्ती. 
सार्थक कासारने कावड मिरवणुकीतून पर्यावरणरक्षणाचे आवाहन केले. 
 
 
वृक्षसंगोपनाची तपश्चर्या 
प्रदूषण करूनी कमी पर्यावरणाची देऊ हमी, प्रगतीचे स्वप्न आहे अपुरे, पर्यावरणरक्षणाने स्वप्न हाेईल पूरे असा मौलिक संदेश सार्थक उमेश कासार या विद्यार्थ्याने कावडीतून दिला. पर्यावरणरक्षणाकडे मानवाचे होणारे दुर्लक्ष भविष्यासाठी किती घातक ठरू शकते, याची जाणीव त्याने फलकातून करून दिली. वृक्षलागवड आणि संगोपन ही तपश्चर्या असून, त्यात सहभागी व्हा. पर्यावरणरक्षणास हातभार लावा, असे आवाहन त्यांने या कावडी मिरवणुकीच्या माध्यमातून सिन्नरकरांना करताना भाविकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. 
 
बेटी है तो कल है 
स्त्री भ्रूणहत्येचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. लेकींचा घटता जन्मदर समाजासाठी घातक असून, त्यावर वेळीच सकारात्मक उपाययोजना होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सिन्नरच्या राजाभाऊ देवकर नामक कावडीधारकाने प्रबोधनाची कावड घेऊन या प्रश्नाकडे यात्रेकरूंचे लक्ष वेधले. आईवर प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे, पत्नीवर प्रेम आहे, मग मुलगी का नको? मुलगा वंशाचा दिवा असला तरी मुलगी दिव्याची वात आहे. त्यामुळे बेटी है तो कल है हे देवकर यांनी प्रबोधनाच्या कावडीतून निदर्शनास आणून देत स्त्रीभ्रूण हत्येस पायबंद घालण्याचे आवाहन केले. साहजिकच ही कावड चर्चेचा विषय ठरली. 
बातम्या आणखी आहेत...