आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमुखाने बाेला, बाेला जय जय हनुमान; शहरात विविध ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचवटी येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात महाअारती करताना महंत भक्तिचरणदास महाराज. - Divya Marathi
पंचवटी येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात महाअारती करताना महंत भक्तिचरणदास महाराज.
 
नाशिक - शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरासह गाेमय, दक्षिणमुखी हनुमान, काट्या मारुती मंदिर अन्य भागांतील हनुमान मंदिरात मंगळवारी माेठ्या भक्तीभावाने जन्माेत्सव साजरा करण्यात अाला. अनेक ठिकाणी प्रवचन, महाप्रसाद विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच पंचवटी, नाशिकराेड, सातपूर, सिडकाे परिसरात निघालेल्या मिरवणुकींनीही लक्ष वेधले. 
 
भक्तिसंगीत कार्यक्रमास श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद 
नाशिक | श्रीहनुमान जयंतीनिमित्त बागेश्री पारिजात भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रामचरित्र गीतांजली’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रभू रामाची हनुमंताची विविध भक्तिगीते मेघा भट, मंगला जोशी, प्रतिभा भट, कुर्लेकर, खैरनार, पाटील यांनी सादर केली. या गीतांना विद्या अनगळ, चारुदत्त दीक्षित यांनी संगीतसाथ केली. यावेळी अनेक मान्यवर भाविक माेठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
भाविकांची मंदिरांत गर्दी 
‘राम लक्ष्मण जानकी.. जय बोलो हनुमान की’, ‘अंजनीच्या सुता... तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बाेला जय जय हनुमान’चा गजर करीत पहाटे पाच वाजेपासूनच नाशिकरोड, उपनगर, जेलरोड, टाकळी परिसरात श्री हनुमानांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी गर्दी केली हाेती. 
 
देवळाली गाव येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर, रोकडोबा वाडी परिसरात रोकडोबा मारुती मंदिर, विहितगावातील मारुती मंदिर, आगरटाकळीला रामदास स्वामी यांच्या मठातील मारुती मंदिरात दिवसभर महाअारती, अभिषेक, महाप्रसाद, प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. नाशिकरोड पोलिस ठाण्यातील मंदिरात हरिनाम सप्ताहाची सांगता आणि हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. तर दक्षिणमुखी मारुती मंदिरातही लाडू वाटप करण्यात आले. 
 
पंचवटीतील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक करण्यात अाला. सूर्योदयावेळी जन्म आरती, १०८ हनुमान चालिसा सामुहिक पठण झाले. सायंकाळी पुष्पांजली महिला मंडळाचे संगीतमय संदरकांड झाले. 
 
महंत भक्तीचरणदास महाराज यांनी श्री पंचमुखी हनुमानांच्या मूर्तीची फुलांद्वारे अाकर्षक सजावट केली हाेती. तसेच १५१ किलो वजनाचा लाडू प्रसादही चढवण्यात अाला. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात अाले. दिवसभर भाविकांची गर्दी कायम हाेती. पंचवटीसह इंदिरानगर येथील पंचमुखी हनुमान मंदिरातदेखील विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गंगापूर नाका येथील हनुमान मंदिर, केटीएचएम कॉलेजजवळील हनुमान मंदिरातही दिवसभर भाविकांची गर्दी बघावयास मिळत हाेती. सातपूरनजीक चुंचाळे गावात असलेल्या प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप झाले. 
 
देखाव्यांनी वेधले लक्ष 
हनुमान जयंतीनिमित्त पंचवटी परिसरातून काढण्यात अालेल्या मिरवणुकींनी लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकींतील जिवंत देखावे, विविध फलक, ढाेल-ताशा पथक याबराेबरच भाविकांचा प्रचंड संख्येने सहभाग हे चित्र नजरेत भरणारे असेच हाेते. बालहनुमानांच्या वेशभूषेतील गदाधारी मुलेही लक्ष वेधून घेत हाेती. 
 
सुंदरकांडावर प्रवचन 
श्रीक्षेत्र टाकळी मठ येथील गाेमय मारुती मंदिरात डाॅ. राजेंद्र मुळे यांचे सुंदरकांडावर प्रवचन झाले. मठात सकाळी ६.२७ मिनिटांनी श्री हनुमान जन्माेत्सव, दुपारी १२ वाजता महाअारती, दुपारी १२.३० वाजेनंतर महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. 

 
बातम्या आणखी आहेत...