आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न वापरताच संपली सर्वच बोटींची वॉरंटी, ‘एमटीडीसी’कडून बोट क्लब सुरू करण्याच्या हालचाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बोट क्लबसाठी कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केल्या गेलेल्या बोटींचा वापर करताच विनाशुल्क देखभाल-दुरुस्तीचा कालावधी संपल्यानंतर जलसंपदा विभागाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केल्याने पर्यटनदृष्ट्या महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प नेमका कधी सुरू होणार हा प्रश्न आजही कायम आहे. 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या बोट क्लबमधील यूएसए मेड युरो-४ च्या बोटी तीन वर्षांपासून विनावापर पडून असल्याने त्यांचा वापर सुरू होईल किंवा नाही, याबाबतचे प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे. शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला बोटक्लब हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जलसंपदा विभागाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केल्याने बोट क्लब सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून गंगापूर धरणाजवळ असलेला बोट क्लब धूळखात पडून आहे. 

बोट क्लबसाठी आवश्यक असलेल्या विविध विभागांच्या परवानग्या मिळण्यास अडचण निर्माण होत होती. यामुळे बोटक्लब सुरू होऊ शकला नाही, तर जलसंपदा विभागाकडे प्रकल्प असल्यामुळे त्याला सुरू करण्यासही अडचण येत होती. आता मात्र, जलसंपदा विभागाने हा बोट क्लब महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला आहे. मात्र, बोटक्लबसाठी खरेदी केल्या गेलेल्या बोटींचा नावापरता विनाशुल्क देखभाल-दुरुस्तीचा कालावधी संपल्यानंतर जलसंपदा विभागाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले ४७ बोटींची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. बोट क्लबच्या परिसरात बांधण्यात आलेल्या कॅन्टिन विश्रामगृहाजवळ असलेले लाखो रुपये किंमतीचे काही बोटांचे भाग गंजत असल्याचे दिसून आले आहे. 

त्यामुळे या बोटींचा पर्यटकांना किती फायदा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत आठ कोटी ९२ लाख मंजूर करण्यात आले होते. या निधीतून कोटी रुपये खर्च करून गंगापूर धरण परिसरात बोटक्लबही तयार करण्यात आले. 

बोट क्लबसाठी खरेदी केलेल्या उपरोक्त बोटी तीन वर्षांपासून प्लास्टिक आवरणात धूळखात पडून आहेत. या काळात त्यांची वॉरंटी संपुष्टात आल्यानंतर त्याचे जलसंपदा विभागाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे या बोट हस्तांतरित केल्या आहेत. 
 
दरवर्षी बदलताहेत उद्घाचनाचा मुहूर्त 
तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी या बोट क्लबचे अभिनेता सलमान खान आणि सुनील शेट्टी यांच्या उपस्थितीत दिमाखदार उद‌्घाटन केले होते. मात्र, या उद्घाचनानंतरही हा बोट क्लब आजवर सुरू झालेला नाही. गेल्यावर्षी पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी १५ फेब्रुवारी २०१६ ला बोट क्लब सुरू करण्याची घोषणा केली होती. तर, त्यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी १५ ऑगस्टला २०१५ लाही बोट क्लब सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर हा मुहूर्तही टळला. आता बोट क्लब एमटीडीसीच्या ताब्यात आल्याने तो नेमका कधी सुरू होणार याची नागरिकांना उत्सुकता लागून आहे. 

प्राथमिक तयारीनंतर लवकरच सुरू होणार 
- जलसंपदा विभागाने बोट क्लब नुकताच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला आहे. यामुळे आता प्राथमिक तयारी सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक तपासण्यानंतर लवकरच बोट क्लब सुरू करण्याची तयारी महामंड‌ळाने केली आहे. बोटींची वॉरंटी संपली आहे. त्यासंदर्भातही वरिष्ठांशी चर्चा केली जाणार आहे. 
-नितीन मुंडवरे, व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. 
बातम्या आणखी आहेत...