नाशिक - गेल्यावेळी उमेदवारीसाठी गर्दीमुळे चर्चेत असलेल्या मनसेने कसेबसे १०३ उमेदवार रिंगणात उतरवले असून, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाेबत छुपी अाघाडी तर काही ठिकाणी अपक्षांचे डबे जाेडून मनसेचे इंजिन धावणार अाहे.
पाच वर्षांपूर्वी मनसेच्या लाटेत ४० नगरसेवक निवडून अाले. यंदा मात्र मनसेची प्रतिकूल अवस्था लक्षात घेत २८ नगरसेवकांनी पक्ष साेडला. दरम्यान, प्रतिकूल स्थितीत मनसेने १०३ उमेदवार दिले अाहेत. जेमतेम दहा नगरसेवक पक्षात असून, नवीन चेहऱ्यांसाेबत राज ठाकरे हे मनसेचे नशीब अाजमावत अाहेत. दरम्यान, मनसेने गुरुवारी ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली हाेती. शुक्रवारी शेवटच्या दिवशी ४९ उमेदवारांची यादी जाहीर केली.
महापाैर रिंगणात; ढिकले सेनापती
महापाैर अशाेक मुर्तडक यांचे दुसऱ्या यादीत चार सदस्यीय पॅनलसाेबत नाव जाहीर झाले. पहिल्या यादीत महापाैरांचे नाव नसल्यामुळे अाश्चर्य व्यक्त हाेत हाेते. दरम्यान, महानगरप्रमुख राहुल ढिकले यांनी उल्हास धनवटे यांना चाल देत यंदा स्वत: थांबणे पसंत केले. शहराची जबाबदारी असल्यामुळे ते सेनापतीच्या भूमिकेत असतील.