आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल दुकानात धाडसी चोरी, लांबवले 15 लाखांचे मोबाइल, पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूररोडवरील याच दुकानातून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने चोरी केली. - Divya Marathi
गंगापूररोडवरील याच दुकानातून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने चोरी केली.
नाशिक - मोबाइल दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे महागडे मोबाइल लांबवले. शुक्रवारी (दि. १७) पहाटे वाजता गंगापूररोडवरील प्रसाद सर्कल येथे ही धाडसी चोरी करण्यात आली. पाच ते सहा चोरट्यांनी नियोजनबद्धरीत्या रेकी करून ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या अाधारे स्पष्टपणे निदर्शनास अाले अाहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले असले तरी या धाडसी चोरीचा शोध लावण्याचे आव्हान गंगापूर पाेलिसांसमाेर आहे. 
 
गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती दुकानमालक सागर लोखंडे यांच्या तक्रारीनुसार प्रसाद सर्कल येथे मोबेक्स मोबाइल एक्स्पर्टीज या दुकानाच्या समोर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यांनी चादर धरत एकाने कुलूप तोडले. एक संशयित दुकानात शिरला. दुकानातील विविध कंपन्यांचे सुमारे १५ लाखांचे मोबाइल अवघ्या वीस मिनिटांत बॅगमध्ये भरले. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक महेश देवीकर यांच्यासह गुुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, श्वानाने सर्कलपर्यंत मार्ग दाखवला. येथून पुढे चोरटे वाहनातून फरार झाले असावेत, असा कयास पाेलिसांनी लावला. दरम्यान, संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. लवकरच गुन्ह्याचा छडा लावला जाईल, असा विश्वास लक्ष्मीकांत पाटील यांनी व्यक्त केला. 
 
पोलिसांपुढे आव्हान 
एेन निवडणुक काळात मोबाइल दुकानात चोरी झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यांचे चेहरेही स्पष्ट दिसत असले तरी श्वानपथकासह पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागल्याने ही चोरी उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान गंगापूर पोलिसांसमाेर आहे. 

रेकी करत केली चोरी 
संशयितांनी रेकी करून चोरी केली असावी. दुकानाच्या शटरच्या रंगाच्या चादरीच्या अाधारे पाच संशयितांनी शटरपुढे पडदा धरला दोघांनी कुलूप तोडले. कुलूपावर कपडा टाकून पळाले. आतील एका चोरट्याने दुकानातील महागडे मोबाइल बॅगमध्ये भरून पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...