आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरणावर बसून ‘समृद्धी’ला जमिनी न देण्याची शपथ, घरधन्यासोबत आत्महत्येसाठी महिलांचीही तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक जिल्ह्यातील शिवडे येथे रचलेल्या सरणावर बसलेले शेतकरी. - Divya Marathi
समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक जिल्ह्यातील शिवडे येथे रचलेल्या सरणावर बसलेले शेतकरी.
सिन्नर - नागपूर-मुंबई या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला नाशिक जिल्ह्यात विराेध वाढत चालला अाहे. सिन्नर तालुक्यात शेतात जागोजागी रचलेल्या सरणांवर बसून शेतकऱ्यांनी एक इंचही जागा या महामार्गासाठी देणार नसल्याची साेमवारी शपथ घेतली. सरकारने बळजबरीने शेतजमिनी संपादित केल्यास घरधन्यासोबत अापणही चितेवर जाऊ, अशी प्रतिज्ञा महिलांनी घेतली अाहे.  
 
भूसंपादनाला विराेध करण्यासाठी रविवारी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी सरण रचले हाेते. साेमवारी काही शेतकरी अर्धनग्न अवस्थेत त्यावर जाऊन बसले. रावसाहेब हारक, उत्तम हारक, हरी शेळके, सोमनाथ वाघ, भास्कर वाघ, किरण हारक, अरुण हारक, विठ्ठल हारक, अनिल शेळके आदींसह बाधित शेतकऱ्यांनी प्रकल्पाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. जमिनीचे मूल्यांकन दर जाहीर केल्यानंतर शिवडेसह बाधित गावांतील शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली असून कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नसल्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शिवडे येथील शेतकरी सरणावर जाऊन बसल्याची माहिती इतर गावांत पसरली. त्यानंतर डुबेरे, सोनांबे, सोनारी, पाटोळे, पाथरे, वारेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रद्द करा, अशा घोषणा देत येथे अांदाेलन करत परिसर दणाणून सोडला. 
 
...जगून करायचे काय?
या महामार्गात बागायती जमिनी जाणार आहेत. अाम्ही भूमिहीन होणार असून जगण्याचे साधनच गेले तर जगून करायचे तरी काय? घरधन्याने जीवन संपवले तर आम्ही कुणासाठी जगायचे, अशा हृदयद्रावक प्रतिक्रिया मीना हारक, वैशाली हारक आदी महिलांनी व्यक्त केल्या. आम्हीही आत्महत्येस तयार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.  
 
हे पण वाचा,
बातम्या आणखी आहेत...