आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशकात दुसऱ्या दिवशी पोलिसांची धडक कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सुरू केलेल्या धडक कारवाईत ४० टवाळखोरांवर कारवाई केली. ३० वाहनांसह शहरातील १५ हॉटेलमधील ग्राहकांची झडती घेण्यात आली. महापालिका निवडणुकीत इच्छुकांकडून कार्यकर्त्यांसाठी ओल्या पार्ट्यांचे आयोजन सुरू असल्याने अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून या पार्ट्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. 
 
निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी सर्वच पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने अंतर्गत ‘धुसफूस’ सुरू अाहे. इच्छुकांकडून कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या स्पर्धेमुळे इच्छुकांकडून साम-दाम-दंड भेद ही नीती वापरण्याची दाट शक्यता असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांवर नजर ठेवली जात आहे.
 
 याच अनुषंगाने शहरात अचानक राबलेल्या कोम्बिंग अॉपरेशनमध्ये ४० टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. नाकेबंदी मध्ये ३० वाहनांची तपासणी करण्यात आली. शहर परिसरातील १५ हॉटेलमधील ग्राहकांची झडती घेण्यात आली. निवडणूकीमध्ये जमाव बंदी आणि शस्त्र बंदी आदेश लागू असल्याने यापार्श्वभूमीवर कसून तपासणी सुरु करण्यात आली आहे. 
 
पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी ही कारवाई सुरुच ठेवण्याचे आदेश देत ‘दंडुका’हाती घेत धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. याआदेशान्वये रविवारी रात्री उपआयुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ.राजू भुजबळ, सचिन गोरे, अतुल झेंडे, मोहन ठाकुर, विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ निरिक्षक सोमनाथ तांबे, दिनेश बर्डेकर, डॉ. सिताराम कोल्हे, संजय सानप, मधुकर कड, यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. रात्री उशिरा पर्यंन्त शहरात धडक कारवाई सुरु होती. 
 
कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही 
-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग सुरू आहे. रात्री उशिरा संशयास्पद फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधा. -श्रीकांत धिवरे, उपआयुक्त, परिमंडळ 
 
मद्यपी रडारवर 
शहरातील नाकेबंदी अंतर्गत गंगापूरराेड येथे एका फेस्टिवलमधून परतणाऱ्या वाहनचालकांची पोलिसांनी अल्को मीटरद्वारे तपासणी केली. त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी येथे ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.