आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - गेल्या पंधरा दिवसांपासून नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पायास भिंगरी लावल्यागत फिरणाऱ्या उमेदवारांचा प्रचार शनिवारी रात्री १० वाजता संपुष्टात येणार आहे. पंधरा दिवसांपासून प्रचाराच्या धडाडणाऱ्या तोफा आज थंडावणार असून विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या भाजप, शिवसेना, काँग्रेस आघाडी, मनसे आदी पक्षांचे नेते, उमेदवार आणि अपक्षांसाठी शनिवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे. त्यामुळे ‘जागते रहो’ चा नारा त्यांना शेवटच्या रात्री द्यावा लागणार आहे.
सिन्नरला शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि भाजपाचे नेते माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. १४ प्रभागातील २८ सदस्य आणि नगराध्यक्ष अशा २९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत सिन्नरकर रविवारी कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकणार यावरच सत्तेचे गणिते अवलंबून आहेत. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमेव मोठी सभा घेऊन सिन्नरकरांकडे झालेली विकासकामे आणि नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या लोकोपयोगी योजना यांचाच आधार घेऊन मतांचे दान मागितले आहे, तर शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, नितीन बानगुडेपाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम यांच्या सभा घेऊन भ्रष्टाचार मुक्त काराभारासाठी मतदारांना परिवर्तनाची साद घातली आहे. काँग्रेस आघाडीनेही आमदार जितेंद्र आव्हाड यांची सभा घेऊन आजी-माजी आमदारांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. मनसेने प्रदेश सरचिटणीस मनोज चव्हाण यांची सभा घेऊन निवडणुकीत शेवटच्या चरणात रंग भरले. असे असले तरी खऱ्या अर्थाने शिवसेना आणि भाजपातच खऱ्या अर्थाने वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य काही अपक्षांनी प्रमुख दावेदार उमेदवारांच्या नाकात दम आणल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपवादात्मक ठिकाणी अपक्ष उमेदवार डोके वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान मतदानाच्या दोन दिवस आधीच बंद होणारा प्रचार यंदा निवडणूक आयोगाने आदल्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत करण्यास परवानगी दिल्याने उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. वाढून मिळालेल्या या एका दिवसाचे चीज कसे करता येईल, या व्यूहरचनेत सध्या सगळ्याच पक्षाचे नेते आणि उमेदवार गुंतले आहेत.

हेवीवेट नेत्यांच्या सामन्याकडे लक्ष
प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेनेने आमदार वाजे यांचे निकटवर्तीय स्टाइसचे तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित करुन भाजपचे उमेदवार संतोष शिंदे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. याच प्रभागात कामगार नेते हरिभाऊ तांबे काँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत.

प्रभाग क्रमांक मधून शिवसेनेचे उमेदवार माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांचा भाजपाचे युगेन क्षत्रिय सामना करत आहेत. याच ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारुवाला यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने मातब्बर उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे, तर प्रभाग क्रमांक मध्ये माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले आणि माजी नगरसेवक बाळू उगले यांच्यात काट्याची लढत होत आहे. त्यामुळे या हेवीवेट नेत्यांच्या प्रभागाकडे नेत्यांसह शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

मोठे नेते येथे विजयी होतात की, साधे कार्यकर्ते जायंट किलर ठरतात, हे सोमवारी स्पष्ट होईल. नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे अशोक मोरे, शिवसेनेचे किरण डगळे आणि काँग्रेसच्या लता हिले यांच्यातच प्रमुख सामना होणार आहे.

हक्काची मते पडणारच असल्याचे गृहीत धरून अनेक उमेदवारांनी बांधावरच्या मतदारांना लक्ष्मीदर्शनाने प्रसन्न करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनेकांनी भोजनावळी, हॉटेलांमध्ये सामिष पार्ट्या देऊन अशा मतदारांना आपल्या बाजूने येनकेन प्रकारे झुकविण्यासाठी नाना पर्याय अवलंबले आहेत. हजार आणि ५०० च्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाचा उमेदवारांना आणि पर्यायाने उमेदवारांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मतदारांना तोटा सहन करावा लागत आहे. हजाराच्या पटीत मतांचा दर मागणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुटे पैसे नसल्याने उमेदवारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे निवडणूक काळात वाहत्या गंगेत हात धुण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या मतदारांच्या पदरी निराशा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...