आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुरलीं’च्या अाठवणींची ‘शाेध’क पाने, शाेकसभेत अनेकांचे पाणावले डाेळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातत्याने वेगळा ‘शाेध’ घेण्याचा ध्यास, संघर्षमय जीवनाची अावड, वैचारिक मात्र वेगळाच सूर दर्शवणारा मित्र, अगदी झाेपडीत राहणाऱ्या मित्रालाही अात्मविश्वासाने प्रेरीत करणारा जीवलग अशी एक ना अनेक रूपे असलेल्या मुरली खैरनार यांच्या अाठवणींची विविध ‘शाेध’क पाने उलगडताना अनेकांच्या डाेळ्यात अश्रू तरळले.
सावानासह शहरातील विविध क्षेत्रातील संस्थांच्या वतीने बुधवारी (दि. ९) सायंकाळी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ज्येष्ठ रंगकर्मी, कांदबरीकार मुरलीधर खैरनार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शाेकसभा अायाेजित करण्यात अाली हाेती. सावाना अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते मुरली खैरनार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी मुरली यांनी त्यांचे जीवन सर्वस्वी रंगभूर्मी, साहित्यासाठी अर्पण केले. त्यांच्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर दर्जेदार कलाकृती, कलावंतही त्यांनी घडविले. मात्र, त्यांच्या या प्रतिभेला साहित्यक्षेत्रातून खराेखरच त्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले का, त्यांच्या या अचानक जाण्यामुळे याची खंत अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचा सूर व्यक्त करण्यात अाला.

ज्येष्ठ पत्रकार प्रा. अनंत येवलेकर यांनी या महान कादंबरीकाराच्या अाठवणींना उजाळा देताना सांगितले की, मुरली हे एक विक्षिप्त रसायन होते. अत्यंत कुशाग्रह बुद्धिमत्ता अन‌् सातत्याने नावीन्यपूर्ण गाेष्टींचा शाेध घेण्याचा ध्यास, अस्वस्थ वृत्ती असल्यानेच त्यांच्याकडून ‘शाेध’ कादंबरी घडली. यानंतर सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी मुरलीधर खैरनार यांचे सावानाची कशाप्रकारे नाते जाेडले गेले, हे सांगताना शोध कादंबरीच्या संदर्भासाठी खैरनार हे सावनामध्ये नेहमी येत असल्याचे सांगितले. त्यांच्यात विषय पेरण्याची अनोखी ताकद होती, अन‌् तितकाच अभ्यासही. म्हणूनच कुठल्याही विषयावर चाैकसपणे बाेलण्याची अाणि कुठल्याही विषयावर सविस्तर चर्चा करण्याची ताकद त्यांच्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कार्यवाह दीपक करंजीकर म्हणाले की, अापली भूमिका नेहमी ठाम मांडण्याचा अाग्रह खैरनार यांनी धरला. त्यांच्या या भूमिकेमुळे नाट्यसंमेलनाचे काही निर्णयही बदलले गेले. मात्र, त्यांच्या आग्रह योग्यच असायचा, हेदेखील तितकेच खरे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनीही नाटक, साहित्य, लेखन क्षेत्रात अायुष्यभर संघर्ष केल्याचे सांगत त्यांची वैचारिक वृत्ती अधाेरेखित केली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठाणचे मंकदर हिंगणे अाणि कार्यवाह लोकेश शेवडे यांनीही मुरली यांच्या अाठवणींना उजाळा देताना सांगितले, त्यांच्या निर्मितीतून साकारलेल्या कलाकृतींमुळेच त्यांची प्रतिभा इतर कलाकारांसाठी अादर्श ठरली. त्यांच्या उच्च प्रतिभेच्या जाेरावरच मराठी साहित्य क्षेत्रात ‘शोध’ कादंबरीचा उल्लेख अावर्जून हाेत राहील.

धंनजय खराडे यांनी मुरलीधर खैरनार यांचे विचार, संशोधन एेकून नेहमीच भारवल्यासारखे व्हायचे, प्रचंड वाचन आणि त्यावर चिंतन ही त्यांची शक्तिस्थाने होती. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर सर्वजण आनंदी असायचे. मात्र, मुरली हे त्यातील उणीवा शोधत असायचे, कदाचित यामुळेच त्यांच्यातील वेगळेपण अाज जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

झाेपडपट्टीत राहणाऱ्या मुलाला अभिनयाचे धडे देत त्याचा अात्मविश्वास उंचावण्यात माेलाचा वाटा उचलला, त्याला संधीही मिळवून दिली, म्हणूनच अाज मी या उंचीवर पाेहाेचलाे असल्याचे सांगत अभिनेते भगवान पाचोरे यांचेही डाेळे पाणावले. यानंतर मुरलीधर देवधरे यांनीही अनेक आठवणींना उजाळा दिला. या वेळी सुरेश गायधनी, कवी किशोर पाठक, स्वानंद बेदरकर, ईश्वर जगताप, स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर आदींसह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.