आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर वाळूमाफियांचा जीवघेणा हल्ला; पाठलाग करून मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईचा राग मनात ठेवून वाळूमाफियांनी तब्बल महिनाभराने नाशिक जिल्ह्यातील  वडनेर दुमालाचे तलाठी यादव विठ्ठल बच्छाव यांच्यावर सोमवारी हल्ला केला.  सकाळी ८ वाजता गर्दीने गजबजलेल्या शहरातील नागजी सिग्नलवर भाजी आणण्यासाठी ते गेले असता सिनेस्टाइल पाठलाग करून लोखंडी रॉड आणि फावड्याच्या दांड्याने त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात  बेशुद्ध झालेल्या बच्छाव यांना नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.    

गेल्या महिन्यात (७ ऑक्टोबरला) भारतनगर येथील नासर्डी पुलावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर गौण खनिज पथकाने कारवाई केली होती. त्या वेळी मंडळ अधिकारी बी.आर. कसबे यांच्यासह  संपूर्ण पथक उपस्थित होते. त्यामध्येच वडनेर दुमालाचे तलाठी यादव बच्छावदेखील होते. त्यांनीच या संपूर्ण कारवाईचा, वाहनाचा  पंचनामा  केला होता. तोच  राग मनात ठेवून तब्बल महिनाभरानंतर  पाळत ठेवूनच त्यांच्यावर हल्ला केल्याचे बच्छाव यांनी सांगितले. मी विधातेनगर अशोका मार्ग येथे राहतो. कार्यालयात जायचे म्हणून नेहमीप्रमाणे भाजीपाला घेण्यासाठी सकाळी ८ वाजताच गेलो होतो. अशोका शाळेकडून नागजी रुग्णालयाकडे जात होतो. नागजी सिग्नलवरच ३ दुचाकींवर प्रत्येकी २-२ याप्रमाणे सहा जण आणि एक पायी असे सात जण आले. त्यांनी मंडळाधिकारी कसबे आणि मी पकडलेल्या वाळूच्या गाडीच्या कारवाईबाबत विचारणा करत माझी गच्ची पकडून मला एक चापट मारली. मला काहीतरी विपरीत घडण्याची शंका आल्याने गाडी सोडून सिग्नलच्या दुभाजकालगत पळू लागलो. तर त्यांनी तिन्ही गाड्यांनी दोन्ही बाजूंनी माझा पाठलाग केला. एक जण पायी माझ्यामागे धावत होता. त्यानंतर त्यांनी मला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे वाहनाचा जॅक चढवण्याची टॉमी, गज आणि  दंडुके  होते. त्यांनी पायावर, पाठीवर, मांडीवर जोरदार हल्ला केला.  एकाने  माझ्या डोक्यात दांडा मारण्याचा प्रयत्न केला. मी तो दांडा पकडल्यानंतर माझ्या छातीत, पायावर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर काही वेळ मी बेशुद्ध झालाे. काही वेळानंतर शुद्ध आल्यानंतर नागरिकांनी मला रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर कर्मचाऱ्यांत दहशत पसरली  आहे.
 
वाळू वाहनात आधीच्या तारखेच्या पावत्या
जप्त केलेल्या वाहनात १० ब्रास वाळू होती. त्याचा पंचनामा तहसीलदारांकडे सादरही केला आहे. त्यानुसार पुढील कारवाई त्यांच्या स्तरावर सुरू आहे. पण गाडी पकडली तेव्हा कुठलीही पावती वाहनात नव्हती. नंतर त्यांनी तहसीलदारांकडे ६ ब्रासच्या पावत्या सादर केल्यात. त्याही आधीच्या तारखेच्या पावत्या असल्याचेही बच्छाव यांनी सांगितले. शिवाय वाहनातून ४ ब्रास वाळू खाली करून घेतली आहे. त्याचा व्हिडिओ आणि फोटोही आमच्याकडे असल्याचे या वेळी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...