आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवीदास पिंगळे यांचा जामीन हायकोर्टाने फेटाळला, सर्वोच्च न्यायालयात घ्यावी लागणार धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणारे समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार आहे. पिंगळे यांना २१ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीदरम्यान अटक करण्यात अाली होती. पाच दिवस पोलिस कोठडीचा कालावधी वगळता २५ डिसेंबरपासून त्यांचा मुक्काम कारागृहात आहे. 
 
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी दिनकर चिखले, अरविंद जैन, विजय निकम यांना पेठरोडवर आरटीओ परिसरात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ५७ लाखांच्या बेहिशेबी रोकडसह अटक करण्यात आली होती. याप्रकरणी संशयितांवर म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुरुवातीपासून पिंगळे यांच्याकडे संशयाची सुई असल्याने विभागाने त्यांना चौकशीची नोटीस बजावली होती. याचदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कर्मचाऱ्यांनी पंचवटी पोलिस आणि एसीबीकडे पिंगळे यांच्याविरोधात तक्रार केली होती. पिंगळे २१ डिसेंबरला एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी आले असता चार तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. 

२५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एसीबीच्या पथकाने पिंगळेे यांचे गंगापूररोडवरील निवासस्थान, मुंबई येथील फ्लॅट आणि कार्यालयात झडती घेतली. यात काही संशयास्पद कागदपत्रे अाढळून आली. न्यायालयाने पिंगळे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पिंगळे यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. 

मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने पिंगळे यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पिंगळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी (दि. १३) उच्च न्यायालयात जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी युक्तिवाद करत पिंगळे यांचा सहभाग स्पष्ट असल्याचे सांगत जामीन दिल्यास पिंगळे यांच्याकडून कामगारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद केला. 
उच्च न्यायालयाने सरकारपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज फेटाळला. आता पिंगळे यांना सर्वोच्च न्यायालयाशिवाय पर्याय नसल्याने त्यांचा मध्यवर्ती कारागृहात मुक्काम वाढला आहे. पिंगळे यांच्याकडून अॅड. गुप्ते तर सरकार पक्षाकडून अॅड. ठाकरे यांनी कामकाज पाहिले.
 
बातम्या आणखी आहेत...