आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बससेवा चालविण्यास भाजपचा लाल कंदील; खासगीला अनुकूलता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यापासून ते स्थानिक पातळीवरील राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी एकीकडे शहर बससेवा महापालिकेच्या माथी मारण्याच्या तयारीत असताना सत्ताधारी भाजपने स्पष्टपणे शहर बससेवा चालवण्यास तूर्तास लाल कंदील दाखवला अाहे. बससेवा चालवणे हे महापालिकेचे काम नसल्याचे सांगत शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांनी पालिकेला काेणताही ताेटा पत्करता खासगी बससेवा मात्र कशी सुरू करता येईल याचा अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले. 
 
शहरी बससेवा ताेट्यात असल्याचे कारण देत एस.टी. महामंडळाने महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरूच ठेवले अाहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत या प्रयत्नांना अधिक वेग अाला असून, मध्यंतरी बससेवा बंद करण्याचे इशारे दिले गेले. काही बसफेऱ्या कमीही केल्या गेल्या. शहरी बससेवा चालवणे हे महापालिकेचेच कर्तव्य वा जबाबदारी असल्याचे दावे केले गेले, तर महापालिकेने मात्र अार्थिक परिस्थिती नसल्याचे तसेच एेच्छिक बाब असल्याचे सांगत हा विषय वेळाेवेळी नामंजूर केला. दरम्यान, स्मार्ट सिटीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा महत्त्वाचा भाग अाहे. त्यामुळे महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अावश्यक विविध पर्यायांची पडताळणी सुरू केली अाहे. 

त्यामुळे एस. टी. बससेवा महापालिका चालवणार का असाही प्रश्न अाहे मात्र सत्ताधारी भाजपने एस. टी. महामंडळाची बससेवा कदापि स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. मुळात पालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे एस. टी.च्या बसेसपासून तर कर्मचाऱ्यांची जबाबदारी काेण स्वीकारणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात अाहे. बसेससाठी भांडारगृह, ठिकठिकाणी बसस्टॅण्ड, पिकअप शेड आदींसाठी जागेच्या उपलब्धतेपासून व्यवस्थापनाचा खर्च हाेणार अाहे. ही बाब महापालिकेला परवडणार नसल्यामुळे वेळ पडली तर खासगी बससेवेची चाचपणी केली जाणार असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले. त्यासाठी इंदूर, अहमदाबाद येथील खासगी बससेवेची पाहणीही केली जाणार अाहे. 
 
एस. टी.कडून वारंवार हाेणारा पत्रव्यवहार लक्षात घेत अामदार सानप यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना पत्र दिले अाहे. पालिका बससेवा चालविण्यास घेत नसल्याचे कारण देत बसेसच्या फेऱ्या रद्द करणे त्यातून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार योग्य नाही, असा टोलाही सानप यांनी लगावला आहे. दरम्यान, बससेवेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन तसेच संबंधित विभागाचे मंत्री, पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक तसेच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...