आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक- ‘इनायत कॅफे’च्या मालकाकडून ग्राहकाला मारहाण, अनधिकृत हुक्का पार्लरची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकाच्या हातून ग्लास खाली पडून फुटल्याने हॉटेल मालकासह व्यवस्थापक आणि सुरक्षेसाठी ठेवलेल्या ‘बाउन्सर’कडून ग्राहकाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार रविवारी (दि. ५) रात्री वाजेच्या सुमारास हॉटेल इनायत कॅफे, गोविंदनगर येथे घडला. या प्रकरणी इनायत कॅफे या हॉटेल मालकाच्या मुलासह व्यवस्थापक आणि बाउन्सरला पोलिसांनी रात्री अटक केली. मारहाणीत युवक गंभीर जखमी असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयितांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 
 
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि नितेश तायडे (रा. कपोते मार्केट) या पानदुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री आठ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत हॉटेल इनायत कॅफे येथे मद्य पिण्यास गेला होता. मित्रांसोबत मैफल रंगत असताना काचेचा ग्लास खाली पडून फुटला. हॉटेल मालक संशयित इनायत फलाह आणि बाउन्सरने याबाबत विचारणा केली असता वाद झाले. काच फुटल्याचा राग आल्याने फलाह याच्यासह त्यांचा मुलगा शादाब फलाह, बाउन्सर एजाज बर्कत, व्यवस्थापक अजीज सिराजउद्दीन यांनी तायडेसह त्याच्या मित्रांना बेदम मारहाण केली. 
 
लोखंडी रॉडने मारहाण केल्याने नितेशच्या डोक्यास आणि डोळ्यास गंभीर मार लागला. काही नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. काही वेळात मुंबई नाका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तीन संशयितांना पथकाने हॉटेलमध्ये अटक केली. हॉटेल मालक इनायत फलाह याच्यासह हॉटेलचे बाउन्सर मात्र फरार आहे. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. संशयितांना सोमवारी (दि. ६) न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 
 
सहायक निरीक्षक केतन राठोड, उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड तपास करत आहेत. हॉटेलमध्ये अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असल्याची तक्रार जखमी युवकासह दोघांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, मारहाण करणारे बाउन्सर कोणत्या खासगी सुरक्षारक्षक एजन्सीचे आहेत? त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...