आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसंगी रक्त सांडू, पण एक इंचही जागा म्हाडाला देणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेच्या जागेसाठी अाडगावमध्ये बुधवारी बंद पाळण्यात अाला. - Divya Marathi
शाळेच्या जागेसाठी अाडगावमध्ये बुधवारी बंद पाळण्यात अाला.
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकरत असलेल्या घरकुल योजनेला आडगावमध्ये प्रचंड विरोध होत आहे. तीस वर्षांपासून ही जागा शाळेला मिळावी यासाठी ग्रामस्थांचा लढा सुरू असताना ही आरक्षित जागा म्हाडाला देण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. याविरोधात बुधवारी (दि. १२) आडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मारुती मंदिरात झालेल्या ग्रामसभेत प्रसंगी रक्तपात झाला तरी चालेल, पण एक इंच जागाही म्हाडाला देण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. 
 
गावकऱ्यांनी म्हाडाचे सपाटीकरणाचे काम रोखल्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. सकाळी सहायक जिल्हाधिकारी विजय गौडा, म्हाडाचे अधिकारी रमेश मिसाळ, तहसीलदार राजश्री अहिरराव, तलाठी बी. पी. शिरसाठ यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. मिसाळ यांनी म्हाडाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. मात्र, या गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत घरांपेक्षा शाळा महत्त्वाची आहे. असा पवित्रा घेत मिसळ यांच्या प्रस्तावाचे खंडण केले. गौडा यांनी गावकऱ्यांची म्हणणे एकून घेत ही बाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे अाश्वासन दिले. माजी नगरसेवक अॅड. जे. टी. शिंदे, पोलिस पाटील एकनाथ मते, सुनील जाधव, पोपट लभडे, बालाजी माळोदे, भिकाजी शिंदे, निवृत्ती मते यांच्यासह रयत शिक्षण संस्था शाखा आडगाव, स्थानिक स्कूल कमिटी, गाव समिती आणि आडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
शुक्रवारी भूमिपुजनावर सावट : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर येथे आहेत. राज्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करणार आहेत. जागेवर म्हाडाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, या भूमिपुजनाला शालेय विद्यार्थ्यांसह गावकरी विरोध करणार असल्याने या भूमिपूजनावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
 
निवासी प्रकल्पासाठी चुकीची जागा : आडगाव शिवारातील जुना जानोरीरोडवरील गट नंबर १५६० मधील अडीज एकर जागा म्हाडाने आरक्षित केली आहे. मात्र याजागेच्या एका बाजूला दशक्रिया विधी केल्या जातात तर दुसऱ्या बाजूला शाळा आहे. अरुंद रस्ता, जागेवर येण्यासाठी गावाला वळसा घालून धोकेदायक महामार्ग ओलांडून यावे लागते. त्यामुळे ही जागा निवासी प्रकल्पासाठी अयोग्य असल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यापुर्वीच वादात सापडला आहे. म्हाडाचे अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आता प्रशासनात सुरू झाली आहे. 
 
भूमि पूजनास विराेध कायम 
-ग्रामपंचायतीच्या काळात शाळेसाठी जागा आरक्षित आहे. घरकुल प्रकल्पासाठी ही जागा अयोग्य आहे. तीस वर्षांपासून शाळेला जागा मिळावी यासाठी ग्रामस्थांचा लढा सुरू आहे. वेळप्रसंगी रक्तपात झाला तरी चालेल, पण म्हाडाचे भूमिपूजन होऊ देणार नाही. भूमिपूजनास विरोध कायम आहे. -अॅड. जे. टी. शिंदे, माजी नगरसेवक तथा स्कूल कमिटी सदस्य, रयत शिक्षण संस्था 
 
घरापेक्षा शाळा महत्त्वाची 
तीस वर्षांपासून ग्रामस्थांकडून ही जागा शाळेला मिळावी यासाठी लढा सुरू आहे. मात्र, प्रशासनाने ही आरक्षित जागा ऑनलाइन पद्धतीने म्हाडाला वर्ग केली. म्हाडाचे नजीकच्या म्हसरूळ परिसरात प्रकल्प लाभार्थ्याविना पडून आहेत. गावापासून दूर असल्याने, या भागात रहिवासी क्षेत्र नसल्याने शासनाची भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. गावकऱ्यांनी ही जागा शाळेसाठी मागणी केली आहे. ही मागणी योग्य असल्याचे प्रशासनातील काही अधिकारी खासगीत बोलत होते. 
 
भूमिपूजन होणारच 
- जागा म्हाडाला देण्याची कायदेशीर पूर्तता झाली आहे. शुक्रवारी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा शुभारंभ होत आहे. गावकऱ्यांचा विरोध असला तरी शासनाचा हा प्रकल्प असल्याने नियोजित भूमिपूजन ठरल्याप्रमाणे केले जाईल. -रमेश मिसाळ, प्रादेशिक अधिकारी, म्हाडा 
 
 
बातम्या आणखी आहेत...